चित्रपटसृष्टी, ग्लॅमर, पैसा, यश, पार्ट्या या सर्व गोष्टी ऐकून अनेकांनाच मनोरंजन विश्वाचा हेवा वाटतो. पण, झगमगाटाच्या या दुनियेच्या पलीकडे आणखी एक जग आहे. त्या जगाकडे बऱ्याचजणांचं लक्ष नसतं किंवा मग या झगमगाटामुळे त्या जगाचं अस्तित्वच बऱ्याचजणांसमोर येत नाही. कारण त्या जगांचं वास्तवही बऱ्याचजणांना हादरवून सोडणारं आहे. बी- टाऊन कलाकारांच्या वाट्याला यश आणि श्रीमंतीसोबतच काही वाईट सवयीही नकळत येतात. या सवयींना व्यसनं म्हणायला हरकत नाही. बरेच बॉलिवूड कलाकार त्यांच्या कारकिर्दीच्या टप्प्यावर व्यसनाधीन गेले आहेत. ज्याचा परिणाम त्यांच्या करिअरवर झाल्याचंही पाहायला मिळालं. चला जाणून घेऊया ते कलाकार आहेत तरी कोण?

संजय दत्त- मद्यपान आणि अमली पदार्थांच्या आहारी गेल्यामुळे अभिनेता संजय दत्तच्या कारकिर्दीवर त्याचा बराच परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. टिना मुनीम आणि संजय दत्त एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. पण, संजयच्या अमली पदार्थ सेवनाच्या सवयीमुळे आणि व्यसनाधीनतेमुळेच टिनाने त्याच्यासोबतचं नातं तोडलं होतं.

परवीन बाबी- ग्लॅमरस अभिनेत्री परवीन बाबी एकेकाळी तिच्या मादक अदांसाठी ओळखली जायची. पण, या अभिनेत्रीच्या आयुष्याचा शेवट बराच करुण झाला. दारु आणि अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या या अभिनेत्रीचं नाव चित्रपटसृष्टीतून हळूहळू नामशेष होत गेलं.

रॅपर हनी सिंग- आपल्या करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच रॅपर हनी सिंग अमली पदार्थांच्या आहारी गेला होता. हनी सिंगच्या रॅपनी सर्वांना भुरळ घातलेली असताना एकाएकी तो दिसेनासा झाला. काही वेबसाइट्सच्या वृत्तानुसार त्याला एका गंभीर आजाराने ग्रासलं होतं.

धर्मेंद्र- हे नाव अनपेक्षित असलं तरीही हे खरंय. वयाच्या पंधराव्या वर्षापासून धर्मेंद्र दारुच्या आहारी गेले होते. एका चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान त्यांनी स्वत: ही गोष्ट सर्वांसमोर सांगितली होती.

मनिशा कोईराला- करिअरच्या अगदी महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच अभिनेत्री मनिषाने कोईरालाने व्यसनांचा आधार घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पतीसोबतच्या नात्यात आलेल्या दुराव्यामुळेच तिने दारु आणि अमली पदार्थांचा आधार घेतला होता.

मीना कुमारी- बॉलिवूडची ‘ट्रेजेडी क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मीना कुमारीद्धा दारुच्या व्यसनाधीन गेल्या होत्या. ‘साहिब बिबी और गुलाम’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला अनेकांनीच दाद दिली होती. पण, वैवाहिक जीवनातील अस्थैर्य आणि घटस्फोटानंतर या अभिनेत्रीने दारुचा आधार घेतला. अवघ्या ४० व्या वर्षी मीना कुमारी यांनी जगाचा निरोप घेतला.

राजेश खन्ना- सलग १५ सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करणाऱ्या अभिनेता राजेश खन्नासुद्धा दारुच्या आहारी गेले होते. प्रसिद्धी, चाहत्यांचं प्रेम आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिलावहिला सुपरस्टार अशी ओळख असणारे राजेश खन्ना एकेकाळी दारुच्या आहारी गेले होते.

दिव्या भारती- वयाच्या १९ व्या वर्षी दिव्याला दारुचं व्यसन लागलं होतं. ९० च्या दशकात चित्रपटसृष्टीवर आपल्या नावाचा दबदबा असलेल्या या अभिनेत्रीच्या व्यसनापोटी करिअर आणि आयुष्याचंही नुकसानच झालं.

रणबीर कपूर- चॉकलेट बॉय रणबीर आणि व्यसन ही बाब अनेकांना पचणार नाही. पण, हे खरं आहे. खुद्द रणबीरनेच एका मुलाखतीत ही बाब स्पष्ट केल्याचं म्हटलं जात आहे. फिल्मस्कूलमध्ये असताना रणबीरला अफूचं व्यसन लागलं होतं असं म्हटलं जातं.