बॉलीवूडजनांसाठी मे महिन्यात नेमेचि येणारा कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. इथे दरवर्षी न चुकता रेड कार्पेटवर हजेरी लावणारे, पदार्पण करणारे, चित्रपटाची प्रसिद्धी वा प्रदर्शन महोत्सवात असल्याने तिथे हजेरी लावणारे बॉलीवूडजन अशी विभागवारी पाहायला मिळते. यंदाही कान महोत्सवाला सुरुवात झाली असून २५ मेपर्यंत चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात कुठल्या भारतीय कलाकारांनी हजेरी लावली, कोण लावणार याची छायाचित्रांसह रंगीत चर्चा सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अंधश्रद्धेचा खेळखंडोबा

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांना वेगळं काढणं अशक्य आहे. किंबहुना आपल्याकडे ऐश्वर्याच्या कान महोत्सवातील रेड कार्पेटवरील लुकनेच चर्चेला सुरुवात होते. दोन दशकांहून अधिक काळ सातत्याने ऐश्वर्या राय बच्चन लॉरिएल ब्रँडची भारतातील प्रतिनिधी म्हणून या महोत्सवात हजेरी लावते. यंदाही तिच्या रेड कार्पेटवरच्या ड्रेसची चर्चा झाली. ७७ व्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ऐश्वर्याने काळ्या आणि सफेद रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसवर मेटॅलिक डिझाइन होते. तर दुसऱ्या दिवशी तिने फाल्गुनी आणि शेन या डिझाइनर जोडीने डिझाइन केलेल्या चंदेरी आणि हिरव्या दुहेरी मिश्र रंगाचे डिझाइन असलेला शिमरी गाऊन परिधान केला होता. ऐश्वर्याला रेड कार्पेटवर या लुकमध्ये पाहिल्यानंतर समाजमाध्यमांवर तिच्या कान महोत्सवातील पदार्पणाच्या लुकविषयी चर्चा सुरू झाली. ‘देवदास’ चित्रपटाच्या निमित्ताने कानवारीवर पहिल्यांदा आलेल्या ऐश्वर्याने भारतीय पेहरावाला पसंती दिली होती. त्या वेळी तिने पिवळ्या रंगाची सोनेरी जरीची किनार असलेली साडी नेसली होती. कान महोत्सवात साडी नेसून रेड कार्पेटवर अवतरणाऱ्या भारतीय अभिनेत्री हाही जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे.

हेही वाचा >>> ‘चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होणे हेच यश’

ऐश्वर्यापाठोपाठ कान महोत्सवात लक्ष वेधून घेणारा नवा चेहरा ठरला आहे तो अभिनेत्री कियारा अडवाणीचा. कियारासुद्धा लॉरिएल ब्रॅण्डची प्रतिनिधी म्हणून कान महोत्सवात उपस्थित झाली आहे. कियाराने तिच्या रेड कार्पेटवरील लुकसाठी फॅशन डिझाइनर प्रबळ गौरांग यांनी डिझाइन केलेल्या व्हाइट स्लिट गाऊनला पसंती दिली. रेड सी फिल्म फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वुमेन इन सिनेमा’ या कार्यक्रमात हजेरी लावली. तर आणखी एका बॉलीवूड अभिनेत्रीने यंदा कान महोत्सवात पदार्पण केले. मॅग्नम या ब्रॅण्डची प्रतिनिधी म्हणून सध्या ओटीटी गाजवणाऱ्या अभिनेत्री शोभिता धूलिपाला या अभिनेत्रीने कान महोत्सवात पहिल्यांदा हजेरी लावली आहे. मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांनीही ‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट’ या त्यांच्या चित्रपटाच्या निमित्ताने कान महोत्सवात पहिल्यांदा हजेरी लावली आहे. नुकत्याच सुरू झालेल्या या महोत्सवात पुढच्या आठवड्यापर्यंत अनेक भारतीय कलाकारांची उपस्थिती दिसेल आणि चर्चाही सुरू राहील.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood fraternity at cannes international film festival zws