Nita Ambani Cries Hugging Rohit Sharma Video: टी २० विश्वचषकात विजयी झाल्यावर टीम इंडिया भारतात परतल्यापासूनच सर्वत्र आनंदाचं व उत्साहाचं वातावरण आहे. विश्वचषकाच्या विजयानंतर आता जवळपास आठवडा पूर्ण होत असला तरी नवनवीन व्हिडीओजच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटप्रेमी विजयाचा क्षण वारंवार जगत आहेत. मुंबईत विजयी परेडमध्ये सहभागी होण्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह साधारण तासभर गप्पांच्या सत्रात सहभाग घेतला होता. मुंबईतील ऊर्जा किती होती हे तर आता वेगळं सांगायची गरजच नाही. महाराष्ट्राच्या विधिमंडळात सुद्धा काल रोहित शर्मासह मुंबईकर खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेळाडूंना १ कोटी तर भारतीय संघाला ११ कोटींचं बक्षीसही जाहीर केलं. थोडक्यात काय तर सर्व स्तरातून टीम इंडियाचं कौतुक होतंय. आता याच कौतुकात अंबानी कुटुंब सुद्धा समाविष्ट झाल्याच्या नव्या क्लिप्स समोर येत आहेत.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या संगीत समारंभात आज रोहित शर्मा, सूर्याकुमार यादव, हार्दिक पंड्या, इशान किशनसह अनेक खेळाडूंनी हजेरी लावली होती. यावेळी नीता अंबानी यांनी सर्व खेळाडूंना विशेषतः रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि सूर्य कुमार यादव यांना मंचावर बोलावून त्यांचा सन्मान केला. स्वतः नीता अंबानी “रोहित रोहित” अशा घोषणा देताना दिसल्या. एवढंच नाही तर अभिनंदन करताना नीता अंबानी यांनी जेव्हा भारतीय कर्णधार रोहित शर्माला मिठी मारली आणि तेव्हा त्यांचेही डोळे पाणावले होते.

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यातील ही व्हिडीओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. हे खेळाडू मंचावर येताना रणवीर सिंग स्टारर ८३ चित्रपटामधील ‘लेहरा दो’ हे लोकप्रिय गाणं मागे सुरु होतं. रोहित शर्मा स्टेजवर येताच नीता यांनी त्याला मिठी मारली. तर सूर्यकुमार स्टेजकडे जात असताना, आकाश अंबानीने त्याला हात मिळवून मिठी मारली. हार्दिकला सुद्धा मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांनी मिठी मारून शुभेच्छा दिल्या. मुंबई इंडियन्सच्या अधिकृत अकाउंटवर या संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

अनंत आणि राधिका यांच्या संगीत सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांची यादी

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या या भव्य दिव्या संगीत समारंभात सलमान खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, एमएस धोनी, साक्षी धोनी, जान्हवी कपूर, सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, अनन्या पांडे, केएल राहुल, अथिया शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी. यांच्यासह अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते.

हे ही वाचा<< “वर्ल्डकप फायनल कधीच मुंबईतुन दूर नेऊ नका”, असं सुनावणाऱ्या आदित्य ठाकरेंना बीसीसीआयचं सडेतोड उत्तर; म्हणाले, “आमचं काम..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राप्त माहितीनुसार, संगीत सोहळ्यानंतर आता ८ जुलैला गृहशांती होणार असून १० जुलै रोजी वधू-वरांच्या सन्मानार्थ एक वेगळा सोहळा होणार आहे. १२ जुलै रोजी अनंत व राधिकाचा विवाह होणार आहे. १३ जुलै रोजी आशीर्वाद सोहळा होणार आहे. आणि शेवटी, १४ जुलैला लग्नाचे भव्य रिसेप्शन होईल