बॉलीवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या घरातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंकज त्रिपाठी यांच्या बहिणीचे पती म्हणजेच त्यांच्या भावोजींचा शनिवारी रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. तसेच त्यांची बहीण सबिता तिवारी यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग – २ वर निरसा बाजार येथे दुपारी ४.३० च्या सुमारास हा अपघात झाला. हे जोडपं प्रवास करत असलेल्या कारने रस्ता दुभाजकाला धडक दिली. राकेश व सबिता बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातून पश्चिम बंगालकडे निघाले होते.

हेही वाचा : अडगळीत टाकलेल्या अनमोल नात्यांची गोष्ट

निरसा बाजार चौकात येण्यापूर्वी हा अपघात झाला. या अपघातानंतर पोलीस आणि स्थानिक लोकांच्या मदतीने दोघांना धनबाद वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं. परंतु, राकेश यांची प्रकृती आधीच गंभीर असल्याने रुग्णालयात नेताच त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

पंकज त्रिपाठींच्या बहिणीचा पाय फ्रॅक्चर झाला असून सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार चालू आहेत. त्यांच्या जीवाला धोका नसल्याचं शहीद निर्मल महतो वैद्यकीय महाविद्यालयाचे इमर्जन्सी एचओडी डॉ. दिनेश कुमार गिंडौरिया यांनी सांगितलं.

हेही वाचा : ग्रॅमी अवॉर्ड विजेती गायिका घरात मृतावस्थेत आढळली, मृत्यूचं कारण अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू

कारची स्थिती पाहता ती सुसाट वेगाने जात असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. राकेश तिवारी हे चितरंजन रेल्वेमध्ये काम करायचे. त्यांची ड्युटी रेल्वेच्या जीएम कार्यालयात होती. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे ते आपल्या घरी गोपालगंजला आले होते. परंतु, परतीचा प्रवास करत असताना ही घटना घडली.