चार वर्षं उलटून गेली तरी अजूनही सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबद्दल चर्चा होताना दिसत आहे. त्याचे चाहते अजूनही या धक्क्यातून पूर्णपणे सावरलेले नाहीत. सुशांतच्या मृत्यूमागचं गूढ हे अजूनही कायम आहे. पोलिसांनी जरी त्याची केस बंद केली असली तरी याबद्दल सोशल मीडियावर चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही गॉडफादरशिवाय केवळ स्वतःच्या मेहनतीवर सुशांतने चित्रपटसृष्टीत स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुशांतच्या याच स्ट्रगलबद्दल नुकतंच अभिनेता विवेक ओबेरॉयने भाष्य केलं आहे. इतकंच नव्हे तर सुशांतच्या अंत्यसंस्कारावेळी विवेक स्वतः तिथे उपस्थित होता. त्यावेळी सुशांतच्या वडिलांना पाहून त्याला काय भावना मनात दाटल्या याबद्दल विवेकने खुलासा केला आहे. इतकंच नव्हे तर आपल्या अडचणीच्या काळात आपणही सुशांतसारखं पाऊल उचलणार होतो हेदेखील विवेकने स्पष्ट केलं.

आणखी वाचा : ‘रंग दे बसंती’ चित्रपटाला नकार देण्याचा शाहिद कपूरला होतोय पश्चात्ताप; अभिनेता म्हणाला, “दुर्दैवाने मला…”

‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’शी संवाद साधताना विवेक म्हणाला, “मी सुशांतला भेटलो आहे, त्याच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या आहेत. तो फारच चांगला, प्रेमळ मुलगा आणि एक उत्कृष्ट कलाकार होता. तो ज्या पद्धतीने आपल्याला सोडून गेलाय तए फारच दुःखद आहे. अगदी खरं सांगायचं झालं तर माझ्याही आयुष्यात एक असा खडतर काळ होता. त्या काळात माझ्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात बरीच उलथापालथ सुरू होती. सुशांतने जे पाऊल उचललं, मीसुद्धा तेव्हा तसंच काहीसं पाऊल उचलायचा विचार करत होतो.”

पुढे विवेक म्हणाला, “सुशांतच्या अंत्यसंस्कारासाठी फक्त २० लोक होती. त्यादिवशी भर पावसात मी सुशांतच्या वडिलांच्या डोळ्यातील वेदना, दुःख पाहिल्या अन् त्यावेळी विचार आला की जर सुशांतने ते दृश्य पाहिलं असतं, त्याच्या जवळच्या लोकांची अवस्था पाहिली असती तर त्याने तो निर्णय कधीच घेतला नसता. त्यावेळी एक गोष्ट मला समजली की तुमच्या जवळच्या लोकांना ज्यांच्यावर तुम्ही जिवापाड प्रेम करता त्यांची अशाप्रसंगी काय अवस्था होईल, त्यांना किती दुःख होईल, यातना होतील? याचा विचार आपण करायला हवा.”

या सगळ्यातून बाहेर पडण्याबद्दल विवेक म्हणाला, “मी स्वतःला खूप नशीबवान समजतो माझ्याकडे एक असं घर आहे, एक कुटुंब आहे जे आम्हाला एकत्र बांधून ठेवतं. त्यावेळी मी एका लहान मुलासारखा खाली जमिनीवर बसलो, माझ्या आईच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि अक्षरशः खूप रडलो आणि मोकळा झालो.” या सगळ्यावर मात करत विवेकने दमदार कमबॅकही केलं. ‘इनसाइड एज’, ‘धारावी बँक’सारख्या वेबसीरिजमधून विवेकने ओटीटीमध्ये पदार्पण केलं. नुकताच विवेक रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या सीरिजमध्येही झळकला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivek oberoi says he thought doing something similar like sushant singh rajput did in his dark phase avn
First published on: 26-02-2024 at 13:33 IST