काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायलयाने गुरुवारी धक्का दिला. न्यायालयाने सलमानला दोषी ठरवतानाच या प्रकरणात अन्य आरोपींना दोषमुक्त केले आहे. यामुळे सोनाली बेंद्रे, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान यांना दिलासा मिळाला आहे.
काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरमधील न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. न्या. देवकुमार खत्री यांनी या प्रकरणी निकाल दिला. न्यायमूर्ती खत्री यांनी सलमान खानला दोषी ठरवले. तर उर्वरित आरोपींची सबळ पुराव्याअभावी सुटका केली. आता सलमानला किती वर्षांची शिक्षा होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, सलमानच्या चाहत्यांनी न्यायालयाबाहेर गर्दी केली आहे. पण ज्यांना तिथपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं त्यांनी आता सोशल मीडियाची मदत घेतली आहे. ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून सलमानचे चाहते त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. सिनेसृष्टीतून तसेच छोट्या पडद्याच्या कलाकारांकडून सलमानला पाठिंबा दिला जात आहे.

हिचकी स्टार राणी मुखर्जीनेही सलमानला तिचा पाठिंबा दर्शवला आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत राणी म्हणाली की, ‘मी नेहमीच सांगत आले आहे की, सलमानला माझा पाठिंबा कायमच राहिला आहे.’ हे तर झाले बॉलिवूडच्या राणीचे छोट्या पडद्यावरील अभिनेता मनवीर गुजरनेही त्याचे मत ट्विटरवरून व्यक्त केले.

मनवीरने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले की, एकीकडे खून आणि बलात्कारांचे पीडित न्यायालयाच्या फेऱ्यांवर फेऱ्या करत असतात पण त्यांना न्याय मिळत नाही. पण एक असा माणूस आहे जो दानधर्म करतो आणि योग्यरित्या करही भरतो त्याला २० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात फसवले जात आहे.

अभिनेत्री काम्याने मनवीर गुजरचं ट्विट रिट्विट करत अंधा कानून असे लिहिले आहे. टी-सीरिजची प्रिया गुप्ताने ट्विट करत म्हटले की, मला हे माहितीये की सलमानने काळवीटची शिकार केली नाही. मला १०० टक्के विश्वास आहे की या प्रकरणात सलमानची सुटका होईल.