‘फँड्री’ या सिनेमापासून ते महिन्याभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘लापता लेडीज’ या हिंदी चित्रपटापर्यंत सातत्याने चोखंदळ आणि नावीन्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणाऱ्या अभिनेत्री छाया कदम यांनी चित्रपट क्षेत्रात स्वत:ची वाट निर्माण केली आहे. सतत नावीन्यपूर्ण भूमिका आणि कथांच्या शोधात असलेल्या छाया कदम यांची गाठ नवोदित लेखकांशीही पडते. मराठीत अनेक लेखकांच्या उत्तम संहिता आपण वाचलेल्या आहेत, पण त्यांचे चित्रपट झालेले अजून ऐकिवात नाही. अशा वेळी गुणवत्ता असलेल्या या नवोदित लेखक – दिग्दर्शकांच्या पाठीशी नागराज मंजुळे, किरण राव यांच्यासारखे उत्तम दिग्दर्शक असायला हवेत, असे वाटत असल्याची भावना छाया कदम यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘फॅन्ड्री’, ‘सैराट’, ‘न्यूड’ अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांबरोबरच ‘अंधाधुन’, ‘कौन प्रवीण तांबे’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘झुंड’, ‘लापता लेडीज’ ,‘मडगाव एक्सप्रेस’ यांसारख्या चित्रपटांमधून दमदार भूमिकेतून प्रेक्षकांना छाया कदम परिचयाच्या आहेत. विविधरंगी व्यक्तिरेखा आणि सशक्त अभिनयामुळे कोणत्याही भूमिका सहज साकारण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. त्यामुळे सहज बदल म्हणून मराठी नाटकापासून सुरू झालेला त्यांचा अभिनयाचा प्रवास कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापर्यंत पोहोचला आहे. या प्रवासाबद्दल ‘लोकसत्ता’च्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये अभिनेत्री छाया कदम यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट’ हा त्यांची भूमिका असलेला चित्रपट कान चित्रपट महोत्सवात मुख्य स्पर्धेसाठी निवडला गेला आहे. १९ चित्रपटांशी स्पर्धा करणारा पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट’ हा गेल्या ३० वर्षांत कान चित्रपट महोत्सवात मुख्य चित्रपटांच्या स्पर्धेसाठी निवडला गेलेला पहिलाच भारतीय चित्रपट ठरला आहे. या महोत्सवात जगभरातील चित्रपटकर्मींबरोबर स्पर्धेत असलेली पायल कपाडिया ही पहिली भारतीय महिला चित्रपट दिग्दर्शक ठरली आहे. या ऐतिहासिक कामगिरी केलेल्या चित्रपटाचा आपण भाग आहोत याचा खूप आनंद आहे, अशी भावना छाया यांनी व्यक्त केली. ‘सध्या जगभरातून कौतुकाचे फोन येत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करू शकेल असा हा चित्रपट आहे याची जाणीव चित्रीकरण करतानाच झाली होती’, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा >>>श्रीकांत : एका जिद्दीची हृदयस्पर्शी कथा

निव्वळ निर्मितीमूल्याचा फरक

मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करताना चित्रपटाच्या निर्मितीमूल्यातील फरक सोडला तर अन्य कुठलाही फरक नाही, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. कलाकार म्हणून दोन्हीकडे काम करताना तोच उत्साह असतो, असं त्यांनी सांगितलं.

मराठीतील नवोदित लेखकदिग्दर्शकांना प्रोत्साहनाची गरज

‘मराठीत देखील वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट होत आहेत. विविध विषय हाताळले जात आहेत. पण प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचवण्यात ते कुठे तरी कमी पडत आहेत त्यासाठी काम केले पाहिजे. यासाठी नवीन दिग्दर्शक आणि लेखकांना प्रोत्साहन दिले पाहिजे, कारण त्यांच्याकडे उत्तम संहिता आणि कथा असतात’, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

संघर्षातून मिळणारा आनंद अनोखा…

‘संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात कायम असतो. तो कधी संपत नाही आणि माझ्या मते संघर्ष कधी संपू नयेत’, असा विचार त्यांनी मांडला. त्यांच्या मते संघर्ष सुरू असताना काम करण्याची मजाच वेगळी असते. कलाकाराचा संघर्ष कधीच संपत नाही, त्याच्या स्वरूपात बदल होतो, असं सांगताना पूर्वी अगदी एखादं दृश्य तरी करायला मिळावं म्हणून संघर्ष करायला लागायचा. आता कामं सातत्याने येत आहेत, पण त्यातही आपल्याला चांगलं काय करता येईल? यासाठी वेगळा संघर्ष करावाच लागतो, असं त्या म्हणतात.

जिमखाना सुरू करायचा होता…

अभिनय क्षेत्रात अपघातानेच आलेल्या छाया यांना जिमखाना सुरू करायचा होता. त्यांना स्वत:ला कबड्डी या खेळाची आवड आहे. ‘मी कबड्डीपटू असल्यामुळे मला जिमखाना सुरू करायचा होता, पण एकाच वर्षी बाबा आणि भाऊ दोघांचंही निधन झालं. त्या दु:खातून बाहेर येण्यासाठी म्हणून मी वामन केंद्रे यांच्या अभिनय कार्यशाळेत प्रवेश घेतला आणि हळूहळू मी तिथे रमू लागले. परकाया प्रवेश काय असतो, तो कसा करायचा हे मी तिथे शिकले, तिथून अभिनयाची आणखी आवड निर्माण झाली’, असं त्यांनी सांगितलं.

नेहमीच वेगळं कसं मिळेल?

आपण भूमिकांच्या बाबतीत चोखंदळ राहण्याचा प्रयत्न करत असलो तरी नेहमीच वेगळी भूमिका कशी मिळेल? असा सवाल करतानाच जी व्यक्तिरेखा वाट्याला आली आहे त्यात काहीतरी नावीन्य देण्याचा प्रयत्न मी करते, असं त्या सांगतात. ‘उदाहरण द्यायचं तर आत्तापर्यंत हिंदी चित्रपटांतही मी अनेकदा मराठी व्यक्तिरेखा केल्या आहेत. ‘लापता लेडीज’ या चित्रपटात मात्र मंजूमाई हे माझं पात्र हिंदी भाषक बाईचं होतं. त्यामुळे सुरुवातीला ती भूमिका करताना माझ्यात मराठी स्त्री अधिक जाणवेल का? अशी भीती वाटायची. पण दिग्दर्शक म्हणून किरण राव यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला. त्यामुळे आज प्रेक्षक मंजूमाई या पात्राचं मनापासून कौतुक करतात’, असं त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaya kadam opined that experienced directors should support newcomers amy