महाराष्ट्र सरकारने यावेळी आंतरराष्ट्रीय ‘कान चित्रपट महोत्सवा’साठी एक नाही तर तब्बल तीन मराठी सिनेमे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी दोन सिनेमांना तर राष्ट्रीय पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. संदीप भालचंद्र पाटील दिग्दर्शित ‘दशक्रिया’, प्रकाश कुंटे यांचा ‘सायकल’ आणि गिरीश जोशी दिग्दर्शित ‘टेक केअर गुडनाइट’ हे तीन सिनेमे ‘कान चित्रपट महोत्सवा’साठी निवडण्यात आले आहेत. नुकतेच घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘दशक्रिया’ आणि ‘सायकल’ला पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात ‘दशक्रिया’ सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा, सर्वोत्कृष्ट पटकथा आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (मनोज जोशी) या पुरस्कारांसाठी निवण्यात आले. तर ‘सायकल’ सिनेमाला सर्वोत्कृष्ट वेशभूषेच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडण्यात आले.

जगातला एक प्रतिष्ठीत चित्रपट महोत्सव म्हणून कान महोत्सवाकडे पाहिले जाते. महाराष्ट्र सरकारने मराठीतले सर्वोत्कृष्ट सिनेमे कान चित्रपट महोत्सवात पाठवण्याची ही दुसरी वेळ आहे. यानिमित्ताने मराठी सिनेमांना आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली मोहोर उमटवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. ‘कान चित्रपट महोत्सव’ यंदा १७ ते २६ मे दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवात सुमारे १४०० सिनेमांचे स्क्रिनिंग होणार आहे.

प्रसिद्ध कादंबरीकार बाबा भांड यांच्या ‘दशक्रिया’ या कादंबरीवर हा सिनेमा आधारला आहे. जीवनाच्या प्रवासातील एका महत्त्वाच्या खरंतर अगदी शेवटच्या टप्प्याच्या परिस्थितीचे आणि त्याभोवती फिरणाऱ्या वास्तवाचे चित्रण या सिनेमात करण्यात आले आहे.