दाक्षिणात्य अभिनेता धनुष सध्या बराच चर्चेत आला आहे. यावेळी धनुष कोणा एका चित्रपटामुळे किंवा त्याच्या गाण्यामुळे चर्चेत आला नसून तो चर्चेत येण्यामागचे कारण काही वेगळेच आहे. २८ फेब्रुवारीला धनुष मद्रास हायकोर्टात गेला होता. जन्मखुणांविषयीचा खुलासा करण्यासाठी धनुष न्यायालयात गेला होता. यावेळी त्याची आईसुद्धा त्याच्या सोबत होती. धनुषचे खरे आई-बाबा कोण? हा वाद सध्या न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. तमिळनाडूमधील एका जोडप्याने धनुष आमचाच मुलगा आहे असे सांगत न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे मंगळवारी धनुषला त्याचे खरे आई- बाबा कोण हे सिद्ध करण्यासाठी त्याच्या अंगावर असलेल्या जन्मखुणे संदर्भातही काही चाचण्या कराव्या लागल्या. या चाचण्या आता आर कथिरेसन आणि त्यांची पत्नी के मिनाक्षी यांच्याशी जुळून येतात की नाही हे काही दिवसांत कळेलच. पण हे जोडपे फक्त पैशांसाठी हे सर्व करत असल्याचे धनुषने सांगितले आहे.

दरम्यान, ‘धनुष आमचा मुलगा आहे’, असा दावा करणारे केथिरेसन हे शिवगंगा जिल्ह्यातील राज्यपरिवहन विभागात कामाला आहेत. धनुष अभिनेता झाल्यानंतर आम्हाला एकदाही भेटला नाही असे केथिरेसन म्हणाले होते. एकदा आम्ही त्याला भेटण्यासाठी चेन्नईला गेलो होतो, पण, आम्हाला त्याला भेटण्याची परवानगी नाकारण्यात आल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला होता. दरम्यान, धनुषचे खरे पालक असल्याचा दावा करणाऱ्या केथिरेसन यांनी आपला मुलगा परत मिळावा यासाठी पोलिसांचीही मदत घेण्याचे ठरवले होते.

ज्या दाम्पत्याने धनुषचे खरे आई-वडील असण्याचा दावा केला आहे त्या दाम्पत्याला न्यायालयाने धनुषच्या शरीरावरील जन्मखुणा दाखवण्याचे आदेश दिले होते. आज सादर केलेल्या पुराव्यांनुसार आता या खटल्याची तारीख गुरुवार २ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी संपूर्ण पडताळणी केल्यानंतरच या प्रकरणाची पुढील सुनावणी करण्यात येणार आहे.