वादाने वाढतो वाद.. असं काहीसं समीकरण सध्या सर्वच क्षेत्रांत विशेषत: मनोरंजन क्षेत्रात रूढ होऊ लागलं आहे. पूर्वी जाणीवपूर्वक वैचारिक- बौद्धिक वादविवाद केले जायचे. सध्या या वादांना सवंग प्रसिद्धीचा वास येतो. इतकंच नाही तर मूळ वादाचा विषय आणि वाद घालणारे बाजूलाच राहतात, त्याउलट समाजमाध्यमांवर त्या वादाचं बोट धरून उडय़ा मारणारे आणखी नवीन वाद निर्माण करताना दिसतात. या सगळय़ा पार्श्वभूमीवर किमान समोरच्या कलाकाराने आपली भूमिका मांडल्यानंतर त्याची दखल घेत वेळीच आटोपता घेण्याचा अभिनेता अजय देवगणचा प्रयत्न स्तुत्यच म्हणावा लागेल. अर्थात याही वादाने दाक्षिणात्य आणि बॉलीवूड चित्रपट या वादाला नव्याने फोडणी दिली आहे हे वेगळं सांगायला नको..

हल्ली कोणाचं विधान कुठे, कशा पद्धतीने प्रसिद्ध होईल आणि त्यावरून कशी वादाची राळ उडेल हे सांगता येत नाही. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर देशभरातील विविध भाषिक चित्रपटांच्या प्रदर्शनांची आणि त्यांच्या कलाकारांच्या प्रसिद्धी कार्यक्रमांची एकच गर्दी झाली आहे. त्यामुळे दरदिवशी एक नवा वाद झडतो आणि हवेत विरून जातो म्हणण्यापेक्षा दुसऱ्या नव्या वादाची बेगमी करून जातो. असाच काहीसा प्रकार दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप याच्या वक्तव्यावरून घडला आहे.

किच्चा सुदीप हा तमिळ, तेलुगू आणि कन्नड अभिनेता असून त्याने हिंदी चित्रपटातूनही भूमिका केल्या आहेत. ‘के.जी.एफ २’ या चित्रपटाच्या यशस्वी घोडदौडीबद्दल बोलताना किच्चा सुदीप याने एक वक्तव्य केले ज्यात तो म्हणाला, ‘‘तुम्ही म्हणता की सध्या देशभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल असा चित्रपट कन्नड भाषेत केला गेला आहे.  मी इथे एक सुधारणा करू इच्छितो की हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही. उलट आज बॉलीवूडपट देशभर पाहिले जावेत म्हणून तमिळ, तेलुगू भाषेत डब केले जात आहेत. त्यांना चित्रपट देशभर पोहोचवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. आणि आज आम्ही असे चित्रपट करतो आहोत जे सर्वत्र चालत आहेत.’’ या वक्तव्यावर मागचापुढचा विचार न करता  स्वत: नुकत्याच एका दाक्षिणात्त्य चित्रपटात छोटेखानी भूमिका केलेल्या अभिनेता अजय देवगणने हिंदी हीच राष्ट्रभाषा आहे, हे ठणकावून  सांगणारे तडक उत्तर दिले. ‘‘किच्चा सुदीप, माझ्या भावा, जर तुझ्या मते हिंदी आपली राष्ट्रीय भाषा नाही तर तुझ्या मातृभाषेत तयार झालेले चित्रपट तू नंतर हिंदीत का बरे भाषांतरित करतोस? हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे,  मातृभाषा आहे आणि ती कायम राहणार’’, अशा आशयाचे ट्वीट अजयने केले. आणि मग हिंदी हीच राष्ट्रभाषा आणि दक्षिणेला हिंदीचे कसे वावडे आहे, इथपासून चर्चेला तोंड फुटले. 

त्यानंतर लगोलग भाषेबद्दल अनादर करण्याचा आपला मानस नसल्याचे स्पष्ट करत आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला असल्याचे किच्चा सुदीपने स्पष्ट केले.  तरीही किच्चा सुदीपचे विधान हे गेल्या काही महिन्यांत दाक्षिणात्य चित्रपटांना मिळालेल्या यशाच्या गर्वातून आले आहे. तर अजयने लगावलेला टोला हा सध्या हिंदी कलाकारांना वाटणाऱ्या असुरक्षिततेतून असल्याचा अर्थ काढत दाक्षिणात्य विरुद्ध हिंदी चित्रपट हा जुनाच वाद नव्याने चघळला जातो आहे. ‘‘मी ज्या संदर्भात ते बोललो तो संदर्भ पूर्णत: वेगळा होता. आपण भेटल्यावर मी तसं का म्हणालो यावर सविस्तर बोलेन. कोणाच्या भावना दुखवायच्या किंवा कुठला वाद निर्माण करण्याचा माझा हेतू नव्हता. मी देशातील प्रत्येक भाषेचा आदर करतो’’, असं म्हणत किच्चा सुदीपने गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आणि अजयनेही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मैत्रीचा हात पुढे केला.

या सगळय़ा वादाला  ‘पुष्पा’, ‘आरआरआर’ आणि ‘के.जी.एफ २’ या चित्रपटांचे यश आणि ‘बच्चन पांडे’,‘जर्सी’सारख्या मोठय़ा हिंदी कलाकारांच्या चित्रपटांचे अपयश याचा संदर्भ आहे हे कोणापासून लपून राहिलेले नाही. दाक्षिणात्यच काय हिंदीला ‘झिम्मा’, ‘पावनिखड’ अशा मराठी चित्रपटांनीही दणका दिला. करोनानंतर सुरू झालेल्या चित्रपटसृष्टीला प्रेक्षकांनी अक्षरश: नवसंजीवनी दिली. भारतात चित्रपटगृहं सुरू झाली आणि बंद पडलेल्या या धंद्याची गाडी वेगाने पुढे जाऊ लागली. पण या वेळी हे यश प्रादेशिक चित्रपटांचं होतं.. यामागे भारतीय प्रेक्षकांची बदलत चाललेली रुची हे महत्त्वाचं कारण आहे. वाद मात्र सध्या भाषेवरून झडतो आहे. इथे जुनीच दुखणी नव्याने उगाळली गेली, तर दक्षिणेकडे राजकारण्यांनी या वादाचा भरभक्कम उपयोग करून घेतला. अभिनेता चिरंजीवी – नागार्जुनसारख्या कलाकारांनी आजवर दाक्षिणात्य अभिनेता म्हणून मिळालेली मर्यादित ओळख, अन्याय्य वागणूक याची उजळणी करत बॉलीवूड हे नेहमीच भेदभाव करत आले आहे, अशी चिखलफेकही केली. हे सगळेच मुद्दे आणि वाद आपापल्या जागी खरे असले तरी हिंदी आणि प्रादेशिक चित्रपटांच्या यशापयशांच्या गणिताने संबंधित चित्रपटकर्मीना गांभीर्याने विचार करायला भाग पाडले आहे, यात शंका नाही. आपण मोठे कलाकार आहोत आणि आपल्या नावावर चित्रपट चालतात, हा हिंदीतील बडय़ा बडय़ा कलाकारांचा समजही प्रेक्षकांनी याआधीच धुळीत मिळवला आहे. त्यामुळे सध्या तिथेही वेगळा आशय देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात भाषेपेक्षाही आशय-विषयातील नावीन्य, साचेबद्ध अभिनयापलीकडे जाण्याचा आग्रह अशा अनेक गोष्टींवर सगळय़ाच भाषेतील कलाकार-निर्माते-लेखक-दिग्र्दशकांना काम करावे लागत आहे.

बॉलीवूड व्यक्त झाले..

निर्माते-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही एक ट्वीट केले ज्यात ते म्हणतात की सत्य तर हे आहे की उत्तरेकडील कलाकारांना दक्षिणेकडील कलाकारांची भीती आणि असुरक्षितता वाटते. भाषांतरित के.जी.एफ. चित्रपटाने सुरुवातीलाच ५० कोटी कमावले , पण काळजी करू नका हिंदीचेही दिवस येतील. असाच काहीसा सूर अभिनेता सोनू सूदनेही आळवला. त्यानेही हिंदीत आणि दक्षिणेत बरेच काम केले आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा केवळ न मानता भारताची मनोरंजन ही भाषा आहे असे मानावे अशी भूमिका त्याने घेतली. प्रेक्षकांना मनोरंजनाची भाषा कळते. त्यामुळे ते आपल्यावर प्रेम करतात आणि आदर देतात असा विश्वास त्याने दर्शवला. तर अभिनेता मनोज वाजपयी यानेही दाक्षिणात्य चित्रपटांना मिळालेले यश हे हिंदीसाठी मोठा धडा आहे, अशी भूमिका मांडली आहे.

हाही ट्रेण्डच..

अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी कायम वेगळे विचार मांडत आला आहे. दाक्षिणात्य चित्रपटांना मिळणारे यश हा आत्ताचा ट्रेण्ड आहे. एखादा हिंदी चित्रपट येत्या काळात यशस्वी ठरला की हे सगळे वाद बरोबर उलटय़ा पद्धतीने सुरू होतील, असे सडेतोड मत त्याने मांडले आहे. यापुढे जात प्रेक्षकांची अभिरुचीही बिघडली आहे, असं विधान त्याने केलं आहे. खरंतर करोनाकाळात ओटीटीमुळे जगभरातील सिनेमाची ओळख झालेल्या प्रेक्षकाची अभिरुची कशी बदलली असेल या शक्यतेच्या अगदी उलट अनुभव सध्या येत असल्याचे सूचक विधान त्याने केले आहे. आता यातला सूचकपणा लक्षात न घेता पुन्हा नवा वाद सुरू झाला तर नवल वाटायला नको!