करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतचं चाललं आहे. या विषाणूला रोखण्यासाठी सध्या जगभरात विविध प्रकारच्या लसींवर काम सुरु आहे. यामध्ये मॉर्डना कंपनीची लस सर्वाधिक पुढे असल्याचं म्हटलं जात आहे. या लसीच्या संशोधनासाठी अभिनेत्री डॉली पार्टन हिने १ मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजे जवळपास सात कोटी रुपये मदत म्हणून दिले होते. ज्यावेळी तिने ही आर्थिक मदत केली त्यावेळी या लसीवर पहिल्या टप्प्यातील संशोधन सुरु होतं. त्यामुळे जगभरातून डॉलीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मॉर्डना लसीवर संशोधन करत असलेल्या तज्ज्ञांनी मिळालेल्या यशाचं श्रेय डॉलीला देखील दिलं आहे. त्यांच्या या स्तुतीमुळे डॉली भारावून गेली. एनबीसीला दिलेल्या मुलाखतीत तिने सर्वांचे आभार मानले आहेत. ती म्हणाली, “आज मी खूप खुष आहे. कुठलंही संशोधन करण्यासाठी संशोधकांना अर्थिक मदतीची गरज असते. अन् मी माझं कर्तव्य पार पाडलं. आज जगाला करोनाशी लढण्यासाठी लसीची गरज आहे. या लसीच्या निर्मितीत मी माझं योगदान देऊ शकले याचा मला आनंद आहे.”

महाराष्ट्रात ४ हजारांपेक्षा जास्त नवे करोना रुग्ण

महाराष्ट्रात मागील चोवीस तासात ४ हजार १५३ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. १ कोटी २ लाख ८१ हजार ५४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी एकूण १७ लाख ८४ हजार ३६१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर मागील चोवीस तासांमध्ये ३० रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मागील चोवीस तासात ३ हजार ७२९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण १६ लाख ५४ हजार ७९३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.७४ टक्के इतका झाला आहे.