धि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित ‘सं. मत्स्यगंधा’ हे प्रा. वसंत कानेटकरलिखित आणि पं. जितेंद्र अभिषेकींच्या अजरामर संगीतानं नटलेलं नाटक मंचित झाल्याला आता अर्धशतकाहून अधिक काळ लोटला आहे. परंतु तरीसुद्धा संगीत नाटकांचे चाहते अजूनही त्याच्या आठवणींनी रोमांचित होत असतात. दरम्यानच्या काळात संगीत रंगभूमी हळूहळू अस्ताला गेली. परंतु गेल्या काही वर्षांत पुन्हा नव्यानं पूर्वी गाजलेल्या संगीत नाटकांची संपादित रंगावृत्ती तयार करून ती मंचित करण्याचं नवं पर्व सुरू झालं आहे. गायक राहुल देशपांडे आणि त्यांच्या हुन्नरी साथीदारांनी आणलेली अशी संगीत नाटकं यशस्वीही झाली. त्यामुळे संगीत नाटकांत नव्यानं प्राण फुंकले गेले.

१ मे १९६४ रोजी रंगभूमीवर आलेलं ‘सं. मत्स्यगंधा’ हे नाटक धि गोवा हिंदू असोसिएशननं पुनश्च एकदा नाटय़संपदा कलामंच या संस्थेच्या सहकार्यानं मंचित केलं आहे. यानिमित्तानं बराच काळ खंडित झालेली गोवा हिंदूची नाटय़निर्मितीची परंपराही पुन्हा सुरू झाली आहे, ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे.

lokrang , cherry blossome, poet on cherry blossome, poet and cherry blossome, cherry blossome poetry, Japan cherry blossom, cherry blossom hyko, Japan cherry blossom culture, cherry blossom season, cherry blossom tradition, world s poerty on cherry blossom, hanami,
निमित्त : चेरीचा बहर आणि कवी
Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
NCERT tweaks Class 12th History book: Harappans indigenous, doubts over Aryan migration
एनसीईआरटी अभ्यासक्रमात बदल; ‘आता आर्य भारतातलेच’, काय सांगते नवे संशोधन?

रामायण आणि महाभारत या प्राचीन कथाकाव्यांनी भारतीय समाजमन शतकानुशतकं व्यापून राहिलेलं आहे. या दोन्हीतली कथानकं-उपकथानकं तसंच त्यांची अपभ्रंशित वा लोकशैलीतील रूपं सर्जनशील लेखकांना समकालीन संदर्भात नवा अन्वय लावण्याकरता प्रेरणादायी ठरत असतात. त्यातही महाभारतकथा या मानवी मनोव्यापार, मानवी व्यवहार आणि नातेसंबंधांचा लख्ख आरसा आहेत असं म्हटलं जातं. अर्थात यात अतिशयोक्ती नाही. मानवी संबंधांतील नाना रंग, त्यांतले सूक्ष्म ताणेबाणे या कथांमध्ये पावलोपावली सापडतात. त्यांतून मानवी जीवनाच्या आकलनाची शहाणीव प्रकर्षांनं प्रकट होते. माणसाच्या वर्तमानकालीन जगण्याशी यातील कथांची नाळ जोडून त्यांचा नव्यानं अर्थ शोधण्याचा प्रयत्न बऱ्याच लेखकांनी केला आहे. ‘सं. मत्स्यगंधा’ हे नाटकही त्यास अपवाद नाही. कानेटकरांच्या महत्त्वाच्या नाटकांमध्ये म्हणूनच ‘सं. मत्स्यगंधा’ची गणना होते. महाभारतकालीन सत्यवतीच्या कथेला स्त्रीचं आत्मभान आणि स्वत्वाची किनार देऊन सत्यवती-शंतनूच्या कथेची या नाटकात केलेली मांडणी कानेटकरांच्या प्रागतिक दृष्टिकोनाचीच साक्ष आहे.

‘मत्स्यकन्या’ सत्यवतीच्या सौंदर्याचा गंध चहुदिशांना दरवळत असताना हिमालयात तपश्चर्येसाठी निघालेल्या तरुण पराशराशी तिची अकल्पितपणे गाठ पडते. पराशर तिच्या सौेंदर्यानं मोहित होतो. सत्यवतीही पराशराच्या प्रेमात पडते. दोघं परस्परांवर अनुरक्त होऊन एकमेकांशी रत होतात. यथाकाल पराशराला आपल्या जीवितध्येयाची आठवण होऊन तो तपश्चर्येसाठी हिमालयात जायचं ठरवतो. त्याच्याशी तनामनानं एकरूप झालेली सत्यवती त्याला त्यापासून परोपरीनं परावृत्त करू बघते. पण पराशराचा निर्धार झालेला असतो. त्याच्यापासून गर्भवती राहिलेली सत्यवती पराशराच्या आणि एकूणच पुरुषी वृत्तीच्या या कटु अनुभवानं शोकसंतप्त होते. सूडाने पेटून उठते.

हस्तिनापूरचे सम्राट शंतनू हेही सत्यवतीच्या सौंदर्यानं घायाळ झालेले असतात. ते तिला मागणी घालतात. सुरुवातीला ती त्यांच्या या मागणीस ठाम नकार देते. कारण अवघ्या पुरुषजातीबद्दलच तिच्या मनात कमालीची घृणा दाटलेली असते. परंतु पुढे शंतनूच्या मागणीला होकार देऊन ती आपल्या सौंदर्याचा सौदा करायचं ठरवते. शंतनूच्या रूपात अख्ख्या पुरुषजातीलाच धडा शिकवायचं ठरवते. ती शंतनूला अट घालते की, माझा होणारा पुत्रच राजा होईल असं वचन त्यानं द्यावं. खरं तर शंतनूच्या प्रथमपत्नीचा पुत्र देवव्रत हा वारसाहक्कानं राजगादीचा स्वामी होणार असतो. पण सत्यवती हटूनच बसते. तेव्हा स्वत: देवव्रत सत्यवतीकडे येऊन आपल्या पित्याच्या वतीनं तिला मागणी घालतो. आणि तिच्या म्हणण्यानुसार आपला राजेपदाचा अधिकार सोडून देत असल्याचं वचन तिला देतो. आपण राजगादीचे साधे सामंत म्हणून आयुष्यभर सेवा करू अशी ग्वाहीही देतो. सूडानं बेभान झालेली सत्यवती ऐन तारुण्यात आपल्या पित्याच्या सुखासाठी देवव्रतानं पत्करलेल्या या वानप्रस्थाश्रमामुळे जराही विचलित होत नाही.

शंतनू-सत्यवती विवाहबद्ध होतात. शंतनू फार काळ जगत नाही. दोन पुत्रांना जन्म दिल्यावर त्याचा मृत्यू होतो. परंतु सत्यवतीची आपल्या पुत्राला राजा करण्याची मनिषा नियतीच्या भयंकर आघातांनी अपुरीच राहते. तिचा पराक्रमी ज्येष्ठ पुत्र तरुण वयातच मृत्यू पावतो. आणि दुसरा पुत्र विलासी रंगढंगांत सतत मश्गुल असतो. देवव्रत मात्र तिला दिलेलं वचन पाळत राजगादीची अखंड सेवा करत राहतो. एव्हाना भीष्मप्रतिज्ञेपायी देवव्रताचा ‘भीष्म’ झालेला असतो. सत्यवतीला नियतीच्या फटक्यांनी आपण केलेल्या भीषण चुकीची जाणीव होते. हस्तिनापूरचे राज्य टिकवायचे असेल तर वचनबद्ध भीष्माला राजा बनवण्याशिवाय आता पर्याय नाही, हे तिला कळून चुकतं. भीष्म मात्र त्यास राजी होत नाही. स्वयंवरात जिंकून आणलेल्या अंबेलाही तो सत्यवतीच्या दुसऱ्या पुत्रास अर्पण करतो. अंबा भीष्माकडे आपल्याला आपल्या प्रियकराकडे परत जाऊ देण्याची विनंती करते. सत्यवतीचा त्याला विरोध असूनही भीष्म तिची ही विनंती मान्य करतो. परंतु भीष्माकडून पराभूत झालेला अंबेचा प्रियकर शाल्व तिचा स्वीकार करत नाही. ती भीष्माकडे परत येते आणि आपला पत्नी म्हणून स्वीकार करण्याची त्याला विनंती करते. मात्र, आपल्या आजीवन अविवाहित राहण्याच्या प्रतिज्ञेवर अढळ राहिलेला भीष्म तिच्याशी विवाह करण्यास स्पष्टपणे नकार देतो. सत्यवतीने विनवूनसुद्धा तो आपल्या या निर्धारापासून मागे हटत नाही. शेवटी शोकसंतप्त अंबा भीष्मास शाप देऊन निघून जाते..

प्रा. वसंत कानेटकरांनी एका मानिनीची नियतीनं केलेली ही दुर्दशा नाटकात मन सुन्न करणाऱ्या विषादासह अप्रतिमरीत्या रचली आहे. सत्यवती आणि भीष्म या नियतीच्या हातातील दोन बाहुल्यांची ही शोकांतिका आहे. पुरुषी अहंकार ठेचू पाहणाऱ्या सत्यवतीला सूडाच्या धगधगत्या आगीत सदसद्विवेकबुद्धीचाही विसर पडतो. आत्मभान आणि स्वत्वाच्या सत्यवतीच्या या लढाईत नियतीच्या फटक्यांनी ती स्वत: धारातीर्थी पडतेच; पण सत्यवचनी भीष्माचाही त्यात हकनाक बळी जातो. दिग्दर्शिका संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी ‘मत्स्यगंधा’च्या संपादित केलेल्या रंगावृत्तीमुळे नाटक अधिक टोकदार झालं आहे. स्त्रीचं आत्मभान ठाशीवपणे अधोरेखित करताना त्यापायी घडलेली भीष्माची शोकांतिकाही त्यामुळे प्रयोगात उठून आली आहे. या नाटकाचा मूळ पौराणिक बाज कायम ठेवून संपदा कुलकर्णी यांनी त्यात वर्तमानातील स्त्रीत्वाचे स-भान संदर्भ अधिक ठाशीव होतील याची जाणीवपूर्वक दक्षता घेतली आहे. त्याचवेळी मानवी जीवनातील नियतीचं अटळ स्थानही त्यांनी कुठं अव्हेरलेलं नाही. सत्यवती आणि अंबेच्या मनातील भावकल्लोळ व्यक्त करण्यासाठी नृत्यभावमुद्रांची केलेली योजना लाजवाब. पात्रांच्या अनावश्यक हालचाली व व्यवहार त्यांनी टाळले आहेत. प्रयोगाची गती कायम राखताना भावनिक प्रसंगांतलं नाटय़ हरवणार नाही, हे त्यांनी पाहिलं आहे. मात्र, नेपथ्यात त्यांनी फ्लॅट्सच्या केलेल्या योजनेमुळे प्रयोगात आपसूक काही मर्यादा आल्या आहेत. गाणी हा या नाटकाचा प्राण आहे हे लक्षात घेऊन त्यांनी त्यांत कसलीही तडजोड केलेली नाही. ‘साद देती हिमशिखरे’, ‘गुंतता हृदय हे’, ‘तू तर चाफेकळी’, ‘मनरमणा मोहना’, ‘नको विसरू संकेत मीलनाचा’, ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’ ही अभिषेकीबुवांच्या सांगीतिक प्रतिभेचा प्रत्यय देणारी गाणी आजही तितकीच अवीट आहेत. ती त्याच नजाकतीनं कलावंतांनी पेश केली आहेत. सचिन गावकर यांच्या नेपथ्यात स्थितीशीलता जाणवते. शीतल तळपदे यांनी नाटकातील मूड्सचे हिंदोळे प्रकाशयोजनेतून व्यक्त केले आहेत.

एकेकाळी प्रचंड गाजलेल्या या नाटकाचं दडपण न घेता तरुण कलावंतांनी ते सहजगत्या पेललं आहे. विशेषत: सत्यवती झालेल्या केतकी चैतन्य यांनी भावविभोर प्रेयसी ते पराशराकडून अपमानित झालेली आणि त्यापायी सूडाने पेटलेली मानिनी, तसंच पुढच्या आयुष्यात नियतीच्या नाना आघातांनी विकल होत गेलेली हस्तिनापूरची राणी आणि हातून घडलेल्या अक्षम्य चुकांची कबुली देत निखळ माणूस म्हणून नियतीचं दान स्वीकारू पाहणारी अगतिक स्त्री.. अशी सत्यवतीची विविध रूपं मुद्राभिनयासह अवघ्या देहबोलीतून उत्कटपणे साकारली आहेत. भीष्म तथा देवव्रताच्या भूमिकेत राहुल मेहेंदळे आपल्या व्यक्तिमत्त्वानं शोभले आहेत. त्यांनी भीष्माचा दृढसंकल्प आणि त्याची नियतीशरण अगतिकता ही दोन्ही रूपं ठोसपणे उभी केली आहेत. सत्यवतीशी झालेल्या पहिल्या भेटीच्या वेळी खरं तर त्याचंही वय तिच्याएवढंच असताना त्याला वयापेक्षा अधिक पोक्त दाखवण्यामागचं प्रयोजन कळलं नाही. नचिकेत लेले यांनी पराशर हा अंतर्यामी निर्मोही, संन्यस्त वृत्तीचा आहे याचं कायम भान राखलं असलं तरीही भावनिक प्रसंगांतही ते कोरडेच राहतात. सत्यवतीच्या रूपसौंदर्यानं घायाळ झालेला आणि तिला सोडून जाताना अपराधीभावानं व्यथित झालेला पराशर प्रत्यक्षात दिसलाच नाही. गायनात मात्र ही उणीव त्यांनी भरून काढली आहे. अंबेचा शोकसंतप्त आक्रोश पूजा राईबागी यांनी प्रत्ययकारी केला आहे. आपमतलबी चंडोलावरील विरंगुळ्याचं दायित्व अमोल कुलकर्णी यांनी हसतखेळत निभावलं आहे. सत्यवतीच्या पित्याचं- धीवराचं काम संजीव तांडेल यांनी यथातथ्य केलं आहे. शशी गंगावणे यांनी देवव्रताचा मित्र प्रियदर्शन चोख वठवला आहे.

एकुणात, रसिकांच्या मर्मबंधातील ही ठेव काळाचं भान राखून पेश केली गेली आहे. त्याचबरोबर गतरम्यतेचा निखळ आनंदही नव्या ‘सं. मत्स्यगंधा’मध्ये भरभरून मिळतो यात संशय नाही.