लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत एप्रिलमध्ये कमाल तापमानाची विक्रमी नोंद झाल्यानंतर बुधवारी मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबई आणि परिसरातील तापमानात पाच ते सहा अंशांनी घट झाली आहे. उष्म्यामुळे होणारी अंगाची लाही, उन्हाचे चटके सहन करणाऱ्या मुंबईकरांना बुधवारी तापमानाचा पारा कमी झाल्याने दिलासा मिळाला.
मुंबई शहर तसेच उपनगरांत उन्हाची तीव्रता कमी जाणवत होती. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सरासरी ३३.२ अंश सेल्सिअस तर, सांताक्रुझ केंद्रात सरासरी ३४.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी दोन्ही केंद्रावरील कमाल तापमानात अनुक्रमे १ आणि ५ अंशांनी घट झाली. मुंबई तसेच उपनगरांत गुरुवारी कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान असेल मात्र हवेतील उष्मा कायम राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
आणखी वाचा-मुंबई : चोरांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे पोलिसाचा मृत्यू
ठाण्यात कमाल तापमानात फारशी घट झालेली नाही. ठाण्यात सरासरी ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद बुधवारी झाली. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी तापमानात १ अंशाची घट झाली. दरम्यान, मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत पुढील चार ते पाच दिवस उष्ण व दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई- ठाण्यात उन्हाचा कडाका कमी झाला असला तरी काही भागात झळा कायम आहेत. राज्यातील सर्वाधिक, ४३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद बुधवारी मालेगाव येथे झाली. याशिवाय सोलापूर (४२.६), नांदेड (४२.६), परभणी (४१), औरंगाबाद (४०.८), जालना (४१), जळगाव (४१.८) येथे पारा चाळीस अंशापार गेला होता.