स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेत शेतकरी आत्महत्येचे उपकथानक
दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्ये अनेकदा समाजातील सद्य:स्थितीचे पडसाद उमटलेले पाहायला मिळतात. मालिकेतील कथानकात त्या दृष्टीने काही बदल केले जातात किंवा मालिकेतील पात्रे/व्यक्तिरेखांच्या तोंडी तसे संवाद दिले जातात. ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवरील ‘दुर्वा’ या मालिकेतही असाच एक बदल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेतील ‘दुर्वा’ आणि ‘केशव’ हे आता काही काळ चक्क शेतकरी होणार आहेत.
राजकीय विषयाची पाश्र्वभूमी असलेल्या ‘दुर्वा’ या मालिकेत सध्या शेतकऱ्याचे कथानक सुरू आहे. पाण्याअभावी रामदास नावाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली असून त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. रामदासच्या कुटुंबावर ओढवलेल्या परिस्थितीची जाणीव दुर्वा आणि केशव या दोघांनाही होते आणि ते त्याच्या कुटुंबीयांच्या मदतीला धावून जातात, असे कथानक मालिकेच्या पुढील काही भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रामदासच्या कुटुंबीयांना मदत म्हणून त्याची जमीन हे दोघेही कसणार आहेत. ‘पाणी अडवा आणि पाणी जिरवा’सारखा प्रयोगही ते शेतात करणार असून अन्य शेतकऱ्यांनाही ते मार्गदर्शन करणार असल्याचे या मालिकेत पाहायला मिळणार आहे. मालिकेतील खलनायक वीरेंद्र निंबाळकर या दोघांसमोर अडथळे आणून त्यांना नामोहरम करण्याचे विविध डाव टाकणार असून त्याला हे दोघे कसे आव्हान देतात आणि स्वत: शेतकरी होऊन शेतकऱ्यांच्या व्यथा ते कसे जाणून घेतात, असे उपकथानक मालिकेत येणार आहे.