गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. वेगळे विषय हाताळणाऱ्या चित्रपटांना मराठी प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. मात्र अशा परिस्थितीत एकाच वेळी व एकाच दिवशी एकापेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित होत असल्याने त्याचा फटका मराठी चित्रपटांना बसतो आहे. १५ जानेवारी रोजी मराठी चित्रपटांचा चौरंगी सामना रंगणार असून गेल्या वर्षीप्रमाणे तोच खेळ पुन्हा एकदा मांडला जाणार आहे.
१५ जानेवारी रोजी ‘चाहतो मी तुला’, ‘चिरंजीव’, ‘शासन’ आणि ‘फ्रेंड्स’ हे चार चित्रपट प्रदर्शित होत आहेत.
‘चाहतो मी तुला चित्रपटात प्रसाद ओक, श्रुती मराठे, सुलेखा तळवलकर, मेघन जाधव, मितीला मिरजकर, भारत गणेशपुरे, विद्याधर जोशी, या कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘शासन’ चित्रपटात अभिनेता भरत जाधव याची वेगळी भूमिका आहे. मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी. मनवा नाईक, अदिती भागवत, वृंदा गजेंद्र, विक्रम गोखले, मोहन जोशी, नागेश भोसले, डॉ, श्रीराम लागू, अमेय धारे, किरण करमरकर या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. ‘चिरंजीव’मध्ये कोकणातील निसर्गसौंदर्य पाहायला मिळणार असून भरत जाधव, अलका कुबल, किशोर कदम, भार्गवी चिरमुल यांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. तर ‘फ्रेंड्स’ चित्रपटात स्वप्निल जोशी, सचित पाटील, गौरी नलावडे आदी कलाकार आहेत.या चारही चित्रपटांतून मराठीतील दिग्गज कलाकार काम करत आहेत. एकाच दिवशी अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यास व्यवसायाच्या दृष्टीने कमी-जास्त प्रमाणात सर्वाना फटका बसतो. याचा पूर्वानुभव असतानाही मराठी चित्रपटसृष्टीत त्यापासून कुणी धडा घेत नसल्याचे चित्र या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. चारही चित्रपटांतली स्पर्धा पाहता त्यांचे तिकीटबारीवरचे भवितव्यही पणाला लागणार आहे.