भारतीय अर्थव्यवस्थेला करोनाचा मोठा फटका बसला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून (NSO) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीत एप्रिल ते जून २०२० या तिमाहीत तब्बल २३.९ टक्क्यांनी घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. त्यांनी मोदींच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या संकटांची एक यादीच पोस्ट केली. त्यांच्या या यादीवर बॉलिवूड दिग्दर्शक हंसल मेहता यांनी टीका केली आहे. “अत्यंत कमकुवत विरोधी पक्ष” असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर उपरोधिक टोला लगावला आहे.

“खूप उडत होते, आता शांत झाले”; सुशांत प्रकरणावर कृष्णा अभिषेकने दिली प्रतिक्रिया

घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेवरुन अनुराग कश्यपचा केंद्राला टोला; म्हणाला…

“भारत मोदी मेड डिझास्टरखाली दाबला गेला आहे,” या शिर्षकाखाली राहुल गांधी यांनी सहा वेगवेगळ्या समस्यांची यादी ट्विट केली आहे. यामध्ये त्यांनी पहिला मुद्दा उणे २३.९ टक्क्यांनी आक्रसलेला जीडीपीचा दर, दुसरा मुद्दा ४५ वर्षांमधील सर्वाधिक बेरोजगारीचा दर, तिसरा मुद्दा १२ कोटी लोकांचा रोजगार बुडणे, चौथा मुद्दा केंद्र सरकारने राज्यांना जीएसटीची रक्कम न देणे, पाचवा मुद्दा करोनाबाधितांच्या आकड्यात आणि मृत्यूमध्ये दैनंदिन पातळीवर सर्वात मोठी जागतिक वाढ भारतात असणे आणि सहावा मुद्दा भारताच्या सीमावर शेजारच्या देशांनी कुरघोड्या करण्याचा असल्याचे म्हटले आहे.

भारताच्या वास्तविक (रियल) जीडीपीमध्ये २६.९ लाख कोटींची घट झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही घट २३.९ टक्के इतकी आहे. नाममात्र (नॉमिनल) जीडीपी ३८.०८ लाखांनी घसरला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही घट २२.६ टक्के इतकी आहे. २२.८ टक्क्यांनी अर्थव्यवस्थेची सरासरी घसरण झाली आहे.