रंगभूमी आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधून काम करणारे अभिनेते अतुल अभ्यंकर यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई आणि पत्नी असा परिवार आहे.
झी मराठी वाहिनीवर सध्या सुरु असलेल्या ‘जय मल्हार’ या मालिकेत ते ‘हेगडी प्रधान’ ही भूूमिका करत होते. ‘वात्रट मेले’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’, ‘केशवा माधवा’ आदी नाटकातून तसेच काही मालिकांमधूनही अभ्यंकर यांनी काम केले होते. पण ‘जय मल्हार’या मालिकेने त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती. यंदाच्या ‘झी मराठी’पुरस्कार सोहळ्यात सवरेत्कृष्ट सहाय्यक पुरुष व्यक्तिरेखा या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. अभ्यंकर यांच्या निधनाने कलाकारांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अविरत चित्रीकरणामुळे वाढत्या कामाचा ताण,  चित्रीकरणाच्या अनियमित वेळा व कामाची अनिश्चितता यामुळे कलाकार, तंत्रज्ञ यांना आरोग्याकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. मालिकेतील कलाकार, तंत्रज्ञ व अन्य कामगार यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यात यावी, त्यांच्यासाठी सकाळी ९ ते रात्री ९ अशी बारा तासांचीच कामाची पाळी असावी, यापेक्षा जास्त वेळ चित्रीकरण चालणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे शिवसेना चित्रपट शाखेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.  
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी, कलाकारांसाठी कामाची वेळ ठरवून देण्यात यावी तसेच महिन्यातून एकदा आरोग्याची आणि ताण-तणावाची तपासणी निर्मात्यांनी करावी, अशी मागणी केली आहे. याबाबत दूरचित्रवाहिन्या आणि निर्मात्यांना तसे पत्र देण्यात येणार आहे. तर अभिनेते जयवंत वाडकर यांनी कलाकारांना अनेक पाळ्यांमध्ये काम करावे लागते. कलाकारांचे आरोग्य आणि सुरक्षितता याविषयी आता सर्व कलाकारांनीच एकत्र येऊन विचार करण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली. अभ्यंकर यांच्या पार्थिवार दुपारनंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.