अभिनेत्री कंगना रणौतच्या आगामी ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाचे निर्माते कमल जैन यांना अर्धांगवायूचा झटका आला आहे. कमल यांची प्रकृती गंभीर अशून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. कमल जैन यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे ‘मणिकर्णिका’च्या टीमला आणखी एक धक्का बसला आहे.

‘ही निश्चितच रुग्णालयात दाखल होण्याची योग्य वेळ नाही. मी लवकरच बरा होऊन परत येईन. मणिकर्णिकाची संपूर्ण टीम, कंगना, प्रसूनजी, शंकर एहसान, अंकिता या सर्वांची मला खूप आठवण येत आहे. मणिकर्णिकाला ब्लॉकबस्टर चित्रपट बनवण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. आता ते स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली आहे,’ असं कमल जैन यांच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.

‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित आहे. येत्या २५ जानेवारी रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. पण प्रदर्शनापूर्वीच त्याला करणी सेनेकडून विरोध होत आहे. करणी सेनेला अभिनेत्री कंगनाने जशास तसं उत्तर दिलं आहे. त्यामुळे आता कोणत्याही अडचणींविना हा चित्रपट प्रदर्शित होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.