दहीहंडी आपण कितीही प्रेमाने उत्सव म्हणून साजरा करत असलो तरी अत्यंत शिस्तीने, सराव करून थरावर थर रचून हंडी फोडणाऱ्या गोविंदांसाठी तो खेळ आहे. आणि त्या खेळाच्या प्रेमापोटी, साहसापोटी अनेक गोविंदा मेहनत करून, सराव करून दरवर्षी त्यात सहभागी होतात. दहीहंडीमागे राजकारण्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी असलेला उत्सव आणि गोविंदांचा खेळ हे द्वंद्व गेली कित्येक वर्षे सुरू आहे. यात गोविंदांचा दृष्टिकोन समजून घेऊन त्या खेळातल्या अडचणी दूर करण्यासाठीचा प्रयत्न दूरच राहिला उलट राजकारणाच्या आवेगात त्याचा खेळखंडोबा झाला, हा विषय अवधूत गुप्ते दिग्दर्शित ‘कान्हा’ या चित्रपटात प्रभावीपणे समोर आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दरवर्षी त्यात सहभागी होणाऱ्या गोविंदांची मानसिकता, त्यांचे जगणे पहिल्यांदाच लोकांसमोर आले, हेही या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल.
‘कान्हा’चे प्रोमो पाहिल्यानंतर अवधूत गुप्तेंच्याच ‘मोरया’ची हटकून आठवण येते आणि काही प्रसंग वगळता तीच दोन गटातली मारामारी पाहायला मिळणार, ही गोष्ट प्रामुख्याने मनात घर करते. तसे दोन गट या चित्रपटात आपल्यासमोर येतातही मात्र यातली चांगली गोष्ट की दोन गटांतील हाणामारी, वैचारिक भांडण हा चित्रपटाचा मुख्य विषय नाही. त्यामुळे सतत ते एकमेकांवर दातओठ खाऊन मारामारी करताना दिसत नाहीत. इथेही ‘जय एकता’ मंडळ आणि ‘जय बजरंग’ मंडळ दोघांमध्येही संघर्ष आहे. ‘जय एकता’चे नेतृत्व रघुकडे (गश्मीर महाजनी) आहे आणि ‘जय बजरंग’चे नेतृत्व मल्हारकडे (वैभव तत्त्ववादी)आहे. रघुच्या टीमने दहीहंडीचा नऊ थरांचा विक्रम केल्याने त्यांचा ग्रुप लोकप्रिय आहे. शिवाय, रघुवर बिल्डर राजकारणी मधुभाई (किरण करमकर) यांचा वरदहस्त असल्याने रघुला दहीहंडीसाठी प्रायोजकांपासून कुठल्याच गोष्टीत अडचण येत नाही. त्याउलट, मल्हारच्या मंडळाला पुढच्याच वर्षी नऊ थरांची दहीहंडी लावायची नाही हा नियम आल्याने रघुचा विक्रम तोडता आलेला नाही. त्यामुळे त्यांना सगळ्याच गोष्टींसाठी झगडावे लागते. वरवर पाहता रघु आणि मल्हारमध्ये भांडण आहे असे वाटत असले तरी त्या दोघांचा खेळाप्रतिचा दृष्टिकोन एकच आहे. त्या दोघांचे खेळावरील विश्वासामुळे घट्ट होत गेलेले नाते हे पाहण्यासारखे आहे. रघुपेक्षा मल्हारच्या व्यक्तिरेखेला भावनिक रंग जास्त आहेत. त्यामुळे मल्हारला वाटणारी उंचीची भीती, त्याचे कानीशी (गौरी नलावडे) असलेले नाते, कान्हाचा प्रवेश अशा अनेक गोष्टींमधून एकूणच दहीहंडीच्या काळात मुंबईभर पसरलेल्या, चाळींमधून राहणाऱ्या गोविंदांचे एरव्हीचे जीवन, त्यांची खेळासाठीची धडपड अशा कित्येक गोष्टी या चित्रपटात पहिल्यांदाच पाहायला मिळतात. दहीहंडीच्या निमित्ताने गोविंदांचा स्वत:च्या राजकारणासाठी वापर करून घेणारे राजकारणीही यात विस्तृतपणे आले आहेत. विश्वासराव सरपोतदार (प्रसाद ओक) आणि मधुभाई ही राजकारण्यांची दोन टोकं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या या दोन गोविंदांमधला फरकही दिग्दर्शकाने सहज रंगवला आहे. मात्र या सगळ्याला दिग्दर्शक म्हणून फिल्मी शेवट करण्याचे स्वातंत्र्य घेतल्याने संपूर्ण चित्रपटभर असलेले वास्तवाचे भान शेवटच्या क्षणी गळून पडते.
‘कान्हा’चे कलाकार ही त्याची खूप मोठी जमेची बाजू आहे. वैभव आणि गश्मीर यांची निवड सार्थ ठरली आहे. वैभवसाठी हा या वर्षांतील त्याचा पाहण्यासारखा पहिला चित्रपट म्हणता येईल. गश्मीरनेही रघु छान रंगवला आहे. त्याच्या दिसण्याचा, नृत्याचा दिग्दर्शकाने उत्तम वापर केला आहे. गौरी नलावडेनेही कानी ही व्यक्तिरेखा मस्त रंगवली आहे. कान्हाची भूमिका करणारा सुमेध वाणीही तितकाच खरा वाटतो. चित्रपटाला गाण्यांचीही तितकीच प्रभावी साथ मिळाली आहे. दहीहंडीचा माहौल आणि त्याच्या मागचे राज-समाजकारण रंगवणारा हा ‘कान्हा’ नक्कीच वेगळा चित्रपट आहे.
कान्हा
दिग्दर्शक – अवधूत गुप्ते
कलाकार – वैभव तत्त्ववादी, गश्मीर महाजनी, गौरी नलावडे, किरण करमकर, प्रसाद ओक, सुमेध वाणी, ओमप्रकाश शिंदे.

lokrang , cherry blossome, poet on cherry blossome, poet and cherry blossome, cherry blossome poetry, Japan cherry blossom, cherry blossom hyko, Japan cherry blossom culture, cherry blossom season, cherry blossom tradition, world s poerty on cherry blossom, hanami,
निमित्त : चेरीचा बहर आणि कवी
Fraud, Fraud with youth,
प्रेमाच्या जाळ्यात अडकून तरुणाची दीड लाखांची फसवणूक
narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
tigress archi video marathi news, loksatta tiger video marathi news
VIDEO: आर्चीच्या बछड्यांची ‘मस्ती की पाठशाला’, टिपेश्वरच्या जंगलातील दंगामस्ती कॅमेऱ्यात कैद