गालावर पडणारी छानशी खळी, केसांचा अंबाडा आणि त्यात माळलेला गजरा, कपाळावर मोठी िबदी आणि त्यांच्या गोऱ्या वर्णाला साजेलशी छान लाल, नारंगी किंवा तत्सम रंगाची साडी अशा शब्दांत वर्णन केले की किरण खेर यांचंच चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. त्यांच्याकडे बघताच क्षणी त्यांच्या गालावरच्या खळीवर फिदा व्हायचं असं ठरवलं तर तेवढय़ातच त्यांची गडद रंगाच्या साडीने आपलं लक्ष वेधून घ्यावं असं त्यांचं रंगीबेरंगी, सदाबहार व्यक्तिमत्व. हिंदी चित्रपटांमधील नेहमीच्या पठडीतील पांढरी साडी नेसून, नेहमी दुखी चेहऱ्यात वावरणारी आई त्यांना कधीच मानवली नाही. मुळात आई ही मुलाची किंवा मुलीची मैत्रिण असू शकते, हे खास पडद्यावर पटवून देण्याचं श्रेय किरण खेर यांच्याकडे जातं. आईच्या पारंपारिक भूमिकेला त्यांनी आपला असा खास पंजाबी तडका दिला. मग ती आपल्या विधवा मुलीच्या पाठीशी उभी राहणारी ‘हम तुम’ मधील राणी मुखर्जीची आई असो किंवा आपला मुलगा समलिंगी आहे हे लक्षात आल्यावर बिथरलेली ‘दोस्ताना’ मधली अभिषेक बच्चनची आई असेल नाहीतर अतिशय अवघड अशा परिस्थितीत मुलाच्या मागे खंबीरपणे उभी राहिलेली अमीर खानची ‘रंग दे बसंती’ मधली आई असेल त्यांची प्रत्येक भूमिका ही लक्षात राहते. हा मोकळेपणा अभिनयातच नाही तर त्यांच्या स्वभावातही आहे आणि म्हणूनच पती अनुपम खेर यांच्याबरोबरचे अनुभव, मुलगा सिकंदरचा अजूनही बॉलिवूडमध्ये सुरू असलेला संघर्ष याबद्दलही त्या तितक्याच मनमोकळेपणे बोलतात.
किरण खेर यांच्यासारखी समर्थ अभिनेत्री पुन्हा ‘टोटल सियाप्पा’ चित्रपटात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. पाकिस्तानी जावयाची सासू रंगवणाऱ्या किरण खेर यांनी सियाप्पा शब्दाचे रहस्यही उलगडून सांगितले. मूळ पटकथेत ‘सियाप्पा’ हा शब्दच नव्हता, असं त्या सांगतात. तो तर मी दिवसभर सेटवर बोलायचे. दिग्दर्शक नीरज पांडेला हा शब्द इतका आवडला की त्याने चित्रपटाच्या नावातच टोटल सियप्पा करून टाकला. यामी आणि अली जफरला मी म्हटलंसुध्दा की आधी तुम्ही या सिनेमात प्रमुख भूमिकेत होतात. पण, आता चित्रपटाचं नावच माझ्या शब्दावरून पडलंय तर चित्रपटाची मुख्य भूमिकाही माझीच झाली ना..’
एखादी भूमिका निवडताना तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घेता?
भूमिकांच्या बाबतीत तर गंमतच आहे. इतक्या सिनेमांमध्ये आईची भूमिका के ल्यामुळे असेल कदाचित पण, एखादा दिग्दर्शक तुम्हाला अमूक अमूक हिरोच्या आईची भूमिका करायची आहे, असे सांगणारा हमखास भेटतोच. तेव्हा मला त्याचा फार राग येतो. तुम्ही नायिकेला सांगता का तुला अमूकच्या मुलीची भूमिका करायची आहे म्हणून? त्यामुळे कलाकालाराला भूमिकेच्या दृिष्टकोनातूनच प्रश्न विचारले जावेत, ही माझी अपेक्षा असते. चित्रपटाची कथा काय आहे, त्यात माझी भूमिका काय आहे आणि मुळात ती माझी भूमिका आहे की नाही अशी सगळी तपशीलवार माहिती घेतल्याशिवाय मी चित्रपटाला होकार देत नाही. कारण, साचेबध्द भूमिका करायला मला आवडत नाहीत मग ती आईची भूमिका असली तरी तिला स्वत:चे व्यक्तिमत्व असले पाहिजे, हे मी स्पष्ट करते.
तुम्ही तुमच्या विनोदी भूमिकांसाठी ओळखल्या जाता. पण तुम्ही गंभीर भूमिका सुद्धा केल्या आहेत. त्याबद्दल थोडंस..  
मी माझ्या कारकिर्दीची सुरूवात नाटकांपासून केली होती. पंजाबच्या नाटकांमध्ये मी ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून प्रसिद्ध होती. सिनेमाच्या सुरवातीच्या टप्प्यावर मी ‘खामोश पानी’, ‘सरदारी बेगम’ अशा चित्रपटांमधून गंभीर भूमिका साकारल्या होत्या. आर्ट सिनेमा करतानाच संजय लीला भन्साळीच्या ‘देवदास’ची ऑफर माझ्याकडे चालून आली. भन्साळीच्या ‘हम दिल दे चुके सनम’ मुळे मी आधीच प्रभावित झाले होते. त्यामुळे ‘देवदास’ला मला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. ‘देवदास’नंतर मला मग व्यावसायिक सिनेमांसाठीच विचारणा होऊ लागली किंबहुना, तशा चित्रपटांची संख्या जास्त असल्यामुळे असेल त्यामुळे साहिजकच जे चित्रपट येत आहेत त्यातच निवड करणे हा एकच पर्याय माझ्यासमोर होता.  
मग विनोदी भूमिकांची सुरवात नक्की कुठून आणि कशी झाली?
‘हम तुम’सारख्या चित्रपटांमधून मी विनोदी भूमिकांकडे वळले. मला पहिल्यांदा जेव्हा ‘हम तुम’ मधली भूमिका ऑफर झाली तेव्हा अनुपमने माझी टर उडवली होती. मी विनोदी भूमिका करू शकेन की नाही यावर त्याला शंका होती. पण, मी ती भूमिका केली. आता तर लोकं मला माझ्या विनोदी भूमिकांसाठी जास्त ओळखतात.
पण, मग तुम्हाला नेमक्या कुठल्या प्रकारच्या भूमिका करायला आवडतात?
मला अजूनही गंभीर भूमिका करायला आवडतात. अशा भूमिकांमधून आपल्या अभिनयाचा कस लागतो. नुकताच मी ‘पंजाब १९४८’ हा चित्रपट केला आहे. पंजाबी भाषेतला हा सिनेमा सुवर्णमंदिरातील हल्ला आणि त्याकाळचा पंजाब यावर भाष्य करतो. मी त्यात दंगलीत हरवलेल्या एका मुलाच्या आईची भूमिका केली आहे. मुलाला शोधण्यासाठीची तिची धडपड आणि त्यादरम्यान तिला आलेले अनुभव हा या चित्रपटाचा विषय आहे.
याआधी नाटकांमधून तुम्ही अनुपम खेर यांच्याबरोबर काम केलं आहे. पण, सिनेमांमधून तुम्ही फार कमी वेळा एकत्र आलात असं का?
आतापर्यंत ‘वीरझारा’, ‘रंग दे बसंती’सारख्या सिनेमांमधून मी आणि अनुपम खेर यांनी एकत्रितपणे काम केलं आहे. पण, दरवेळी एकतर सिनेमात माझी भूमिका मोठी आणि त्याची छोटी असते किंवा त्याची भूमिका मोठी आणि माझी छोटी असते. लवकरच त्यांच्यासोबत एक पूर्ण सिनेमा करायची इच्छा आहे. पण, भूमिका तितकीच ताकदीची असली पाहिजे. मग ती नवरा-बायको म्हणूनच असायला हवी असं नाही. दोन वेगवेगळ्या भूमिकांमधूनसुद्धा आम्ही लोकांसमोर येऊ शकतो. खूप वर्षांपूर्वी आम्ही दोघांनी मिळून ‘सालगिरा’ नाटक केलं होतं. त्यानंतर मात्र हा योग पुन्हा जुळून आला नाही हे खरं आहे.    
राजकीय असो किंवा सामाजिक प्रश्न. तुम्ही नेहमी तुमची मत ठामपणे मांडता. ‘इंडियाज गॉट टॅलेण्ट’ सारख्या रिअ‍ॅलिटी शोजमधून तुमची एक वेगळी छबी लोकांसमोर येते आहे..
आपल्याकडे चित्रपट अभिनेते फक्त त्यांच्या लुकसाठी ओळखले जातात. पण, एक व्यक्ती म्हणून आम्हालासुद्धा आमची अशी ठाम मतं असतात. मी एका सधन कुटुंबातील घरातून आली आहे. मी शिकून सरकारी नोकरीत रुजू व्हायचं असं कुठल्याही पंजाबी कुटुंबातील वडिलांप्रमाणे माझ्या वडिलांचंसुद्धा स्वप्न होतं. पण, मी नाटकांच्या दिशेला वळले. एक व्यक्ती म्हणून माझी मतं मांडण्याची संधी मी कधीच सोडत नाही. मग तो राजकीय मंच असो नाहीतर रिअ‍ॅलिटी शोज. इंडियाज गॉट टॅलेण्ट, कुरुक्षेत्र सारख्या शोजमधून मला लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळते. त्यांना सामोरी जाताना मी किरण खेर म्हणून सामोरी जाते. तेव्हा माझ्या चेहऱ्यावर कोणताही मुखवटा नसतो. माझी मते, माझे विचार त्यांच्यासमोर मांडायची मिळणारी संधी मला महत्वाची वाटते.      

“मी आणि अनुपम खूप चांगले मित्र आहोत. अगदी आमच्या लग्नाआधीपासून मी त्याला माझ्या मनातली प्रत्येक गोष्ट सांगत असे. तो देखील माझ्याकडे मन मोकळं करत होता. आजही मला काहीही खुपलं अगदी त्याच्याबद्दलची तक्रार असेल तरीही मी त्याच्याशी लगेच बोलते. इतर कोणाचीच गरज मला भासत नाही. सिकंदरबद्दल बोलायचं तर तो अजूनही धडपडतोय हे खंर आहे. स्वत:चं  स्थान बॉलिवूडमध्ये पक्कं करण्यासाठी प्रयत्न करतोय. पण, त्याचवेळी त्याला खूप छान भूकिाही मिळताहेत. नुकताच त्याने ‘तेरे बीन लादेन पार्ट टू’ हा चित्रपट पूर्ण केला आहे. तो त्याच्या कामाबद्दल खूप खूष आहे. हळूहळू तोसुद्धा स्थिरस्थावर होईल.”