ज्येष्ठ सतारवादक पं. कार्तिककुमार यांना ‘हृदयेश संगीत सेवाव्रती’ पुरस्कार;  पं. मुकुल शिवपुत्र यांचाही ६१ व्या वर्षपूर्तीनिमित्त सन्मान

मुंबईतील ‘सवाई गंधर्व’ अशी ख्याती लाभलेला ‘लोकसत्ता’ प्रस्तुत २७ वा ‘हृदयेश फेस्टिव्हल’ येत्या १३ ते १५ जानेवारी या कालावधीत विलेपार्ले (पूर्व) येथील पार्ले टिळक विद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आला आहे. ‘हृदयेश आर्ट्स’ने या तीनदिवसीय सांगीतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवात ज्येष्ठ सतारवादक पं. कार्तिककुमार यांना यंदाचा ‘हृदयेश संगीत सेवाव्रती पुरस्कार’ ज्येष्ठ तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे, तर पं. मुकु ल शिवपुत्र यांनीही वयाची एकसष्टी पूर्ण केली असल्याने त्यांचा खास सन्मान ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते होणारोहे.

संगीतातील रथी-महारथींना ऐकण्याची संधी देणाऱ्या या महोत्सवाचा शुभारंभच १३ जानेवारीला संध्याकाळी ६.३० वाजता पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्या गायनाने होणार आहे. त्यानंतर निलाद्रीकुमार यांचे सतारवादन होणार असून त्यांना उस्ताद झाकीर हुसेन तबलासंगत करणार आहेत. याच दिवशी ज्येष्ठ सतारवादक पं. कार्तिककुमार यांना ‘हृदयेश संगीत सेवाव्रती पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी १४ जानेवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता  पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. त्यानंतर आघाडीचे व्हायोलिनवादक मिलिंद रायकर व यज्ञेश रायकर यांचे व्हायोलिनवादन होणार आहे. दुसऱ्या सत्राची सांगता पं. राजन, साजन मिश्रा यांच्या गायनाने होणार आहे. या वेळी मिलिंद रायकर यांचा ५१ वा वाढदिवस आणि पं. राजन मिश्रा यांची एकसष्टी असा योगायोग जुळून आला असल्याने या दोघांचाही खास सत्कार होणार आहे.

रविवार, १५ जानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजता प्रात:कालीन मैफलीने महोत्सवाचा तिसरा दिवस सजणार आहे. उस्ताद अमजद अली खान यांच्या सरोदवादनाचे सूर सकाळी सभागृहात गुंजतील. त्यांना सत्यजित तळवलकर, अनुव्रत चॅटर्जी तबलासाथ करणार असून संध्याकाळच्या सत्राची सुरुवात गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या गायनाने होणार आहे. राकेश चौरसिया यांचे बासरीवादन होणार असून त्यांना सत्यजित तळवलकरांची तबलासाथ लाभणार आहे. उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या या महोत्सवाचा समारोप पं. मुकुल शिवपुत्र यांच्या बहारदार गायनाने होणार आहे. मात्र त्याआधी त्यांच्या एकसष्टीचे निमित्त साधून ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. महोत्सवाच्या प्रवेशिका दीनानाथ नाटय़गृहात तसेच ‘बुक माय शो’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.