पृथ्वीवरील सर्वात मोठे जंगल म्हणून ओळखले जाणाऱ्या अ‍ॅमेझॉन पर्जन्यवनात लागलेल्या भीषण आगीला प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियो जबाबदार होता. असा खळबळजनक आरोप ब्राझिलचे राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो यांनी केला होता. हे आरोप लिओनार्डोने फेटाळून लावले आहेत.

काय म्हणाला लिओनार्डो?

त्याने एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून जेयर बोल्सोनारो यांनी केलेल्या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे. “मी कुठल्याही स्वयंसेवी संस्थेला अॅमेझॉन पर्जन्यवनात आग लावण्यासाठी पैसे दिले नाहीत. परंतु होय, मी पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या संस्थांना आर्थिक सहाय्य करतो. कारण भविष्यातील आपत्तींची पेरणी करणे थांबवायचे असेल, तर विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधणे अत्यंत गरजेचे आहे.” अशा शब्दात लिओनार्डोने प्रतिक्रिया दिली.

जेयर बोल्सोनारो यांनी काय केला होता आरोप?

“लिओनार्डोने अ‍ॅमेझॉनच्या जंगलात काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेला पैसे दिले होते. त्याच संस्थेने लिओनार्डोच्या सांगण्यावरुन जंगलात आग लावली. पुढे ही आग पसरत गेली आणि तिने वणव्याचे रुप धारण केले.” असा आरोप ब्राझिलचे राष्ट्रपती जेयर बोल्सोनारो यांनी केला होता. मात्र हा आरोप सिद्ध करण्यासाठी त्यांनी अद्याप कोणताही पुरावा सादर केलेला नाही.

पृथ्वीवरील सर्वात मोठे जंगल म्हणून ओळखले जाणाऱ्या अ‍ॅमेझॉन पर्जन्यवनात ऑगस्ट महिन्यात भयंकर वणवा पसरला होता. यामुळे १७ दिवस अ‍ॅमेझॉन जंगल आगीत होरपळत होते. या आगीमुळे २ लाख ४० हजारांपेक्षा अधिक झाडे जळून खाक झाली.