यश मिळवणे सोपे आहे परंतु ते टिकवणे ही अत्यंत कठीण प्रक्रिया आहे. ज्यांना ते जमतं त्यांना आपण ‘सुपरस्टार’ संबोधतो बाकी सर्व मंडळी आजीवन फक्त स्टार म्हणून वावरतात. नव्वदच्या दशकांत आपल्या मादक अदांनी तरुणांच्या मनावर राज्य करणाऱ्या लुना दे लेसेप्सला आपल्या अभिनयाचा ढोल दीर्घ काळ बडवणे काही शक्य झालं नाही आणि काळाच्या ओघात इतर सामान्य कलाकारांप्रमाणे तीही पडद्यावरून नाहीशी झाली. बराच काळ प्रसिद्धीपासून दूर राहिलेली लुना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती कुठल्या चित्रपटासाठी नव्हे तर पोलिसांना केलेल्या मारहाण प्रकरणामुळे..

५२ वर्षीय लुना आपल्या कुटुंबासमवेत नाताळ साजरा करण्यासाठी फ्लोरिडाला गेली होती. २५ डिसेंबरच्या त्या पार्टीत सकाळी सहा वाजेपर्यंत मद्यपान करणारी लुना इतक्या नशेत होती की तेथील सुरक्षारक्षकांनाही तिला तिथून हलवणे शक्य झाले नाही. शेवटी नाइलाजाने हॉटेल व्यवस्थापकाने पोलिसांची मदत घेतली. तिला तिच्या खोलीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन पोलिसांनी तिने खूप शिवीगाळ केली, परंतु ते तिच्याकडे दुर्लक्ष करत आहेत हे लक्षात येताच तिने त्या दोघांनाही मारायला सुरुवात केली. एकाच्या तर थेट तिने कानाखाली चपराक लगावली.

ही नाटय़मय घटना पाहणाऱ्यांनाही अवाक् करून गेली मात्र शुद्धीवर आल्यानंतर झाला प्रकार लक्षात येताच लुनाने स्वत:ला वाचवण्यासाठी पोलिसांवरच लैंगिक शोषणाचा आरोप केला. पोलिसांनी तिला अटक केलीच शिवाय न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दोन लाख डॉलर्सच्या बदल्यात तिला जामीन मंजूर केला मात्र पोलिसांना पुरावे गोळा करण्याचेही आदेश दिले. पोलिसांनी वेगाने पुरावे गोळा केले आहेत हे समजून चुकलेल्या लुनाने तुरुंगात जाण्याच्या भीतीने सर्व आरोप मान्य केले आणि पोलिसांची माफीही मागितली.