दूरदर्शनवर जवळपास ३० ते ३५ वर्षांपूर्वी प्रसारित झालेली ‘रामायण’ ही मालिका प्रचंड गाजली. विशेषतः प्रभू श्रीराम आणि सीतमातेची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. या मालिकेत प्रभू श्री रामचंद्रांची भूमिका अभिनेते अरुण गोविल तर सीता मातेच्या भूमिकेत अभिनेत्री दीपिका चिखलिया झळकल्या होत्या. या दोन्ही कलाकारांनी त्याकाळी प्रत्येक घराघरांत लोकप्रिय मिळवली. आजही या कलाकारांना प्रेक्षक राम-सीतेच्या रुपात ओळखतात.

अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया या जोडीची अफाट लोकप्रियता आजतागायत कायम असून त्यांच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता येणार आहे. ‘वीर मुरारबाजी…पुरंदरची युद्धगाथा’ या मराठी चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा : राम जन्मला गं सखी…; बाबुजींच्या भावसंगीताचा रंजक प्रवास, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांची जोडी आता मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे. निर्माते अजय आरेकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी भाऊसाहेब आरेकर यांनी सांभाळली आहे तर, दिग्दर्शन अजय-अनिरुद्ध यांनी केलं आहे.

पुरंदरच्या लढाईत न भूतो न भविष्यती असा पराक्रम गाजवणाऱ्या शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा भव्यदिव्य स्वरूपात रुपेरी पडद्यावर मांडणारा ‘वीर मुरारबाजी…पुरंदरची युद्धगाथा’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. आजच्या पिढीला आपल्या स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास पाहता यावा यासाठी ही चित्ररूपी कथा मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे.

हेही वाचा : “सलमानला जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार”, पोलिसांनी दिली माहिती; म्हणाले, “दोन्ही आरोपी…”

दरम्यान, ‘वीर मुरारबाजी’ चित्रपटात शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांच्या मुख्य भूमिकेत अभिनेता अंकित मोहन झळकणार आहे. उत्तोमोत्तम कलाकारांची जोड असल्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.