राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची काही दिवसांपूर्वी ईडी चौकशी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने दोन महिन्यापूर्वी त्यांची तब्बल ११ तास चौकशी केली होती. यानंतर पत्रकार परिषद घेऊन रोहित पवारांनी कोणत्याही कारवाईला घाबरलेलो नाही असं म्हटलं होतं. यासंदर्भात आता अभिनेते व शिवसेना ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.

अभिनेते किरण माने ‘बिग बॉस मराठी’मुळे प्रसिद्धीझोतात आले. दोन महिन्यांपूर्वी हातात शिवबंधन बांधत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला होता. खूप विचार करून ही राजकीय भूमिका घेतल्याचं त्यांनी पक्षप्रवेश करताना सांगितलं होतं. अनेक सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर किरण माने आपली परखड मतं समाजमाध्यमांवर मांडत असतात. सध्या त्यांनी रोहित पवारांविषयी शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी रोहित पवार यांचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा : Video : “मला गॅरंटी नव्हती, पण…”, कॅन्सरवर मात करून अतुल परचुरेंनी केलं कमबॅक; सर्वच कलाकारांचे डोळे पाणावले

किरण मानेंची पोस्ट

ईडीची धाड पडल्याची बातमी आल्या-आल्या रोहितदादांना मी फोन केला होता. दुपारचे दोन वगैरे वाजले असतील. रिंग झाली पण उचलला नाही. सहसा असं होत नाही. म्हटलं, नक्की ते ईडीच्या चौकशीत असतील…
त्या दिवशी संध्याकाळी माझ्या सासुरवाडीला धामणेरला एक कौटुंबिक कार्यक्रम होता तिकडे गेलो. सगळ्या पाहुण्यांच्या गराड्यात असताना फोन वाजला. स्क्रीनवर नाव बघतोय तर रोहितदादा! “बोला किरणजी. तुमचा मिसकॉल दिसला.” मी अत्यंत कळकळीनं दादांना म्हणालो, “हे बघा दादा. ईडी येऊद्या, सीबीआय येऊद्या नाहीतर ते रंगाबिल्ला घरात येऊद्या… तुम्ही लाचार झालेले आम्हाला चालणार नाही. तुरूंग तर तुरूंग. आम्ही रस्त्यावर उतरून लढू तुमच्यासाठी. पण तुम्ही कसल्याही परिस्थितीत त्या XXXXXX वळचणीला जाऊ नका.”
रोहितदादा हसले, “किरणजी, अजिबात चिंता करू नका. निर्धास्त रहा. मी हलत नाही.”
आजपर्यंत सगळी चौकशी, जप्ती वगैरेंचा मनस्ताप सहन करून हा वाघ ताठ कण्यानं उभा आहे. मीटिंग्ज घेतोय. सभा गाजवतोय. तिकीटं वाटपाच्या निर्णयात अधिकारवाणीनं मतं मांडतोय. देणारा हात आहे, तो कुणापुढं पसरणारा झालेला नाही!
गड्याहो, आयुष्यात हा स्वाभिमान महत्त्वाचा. रोहितदादा, तुम्ही तो जपलात. आम्हाला तुमचा अभिमान आहे. आता लढायचं, झुंजायचं आणि जिंकायचं. बास.
जय शिवराय… जय भीम.
किरण माने.

हेही वाचा : “लोकांना जाड आणि बारीक…”, सततच्या ट्रोलिंगमुळे सई लोकूर संतापली; म्हणाली, “अतिशय लाजिरवाणी…”

दरम्यान, किरण मानेंनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत आपली मतं मांडली आहेत. याशिवाय त्यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकतेच ते ‘तेरवं’ या चित्रपटात झळकले होते. तसेच याआधी त्यांनी ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत भूमिका साकारली होती.