बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत कपूर यांच्या आयुष्यात काही दिवसापूर्वीच एका नव्या पाहुण्याचा आगमन झालं आहे. सोशल मीडियावरही शाहिदच्या मुलाचं मोठ्या प्रेमाने स्वागत करण्यात आलं. कपूर कुटुंबात झालेल्या या नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे मीरा दुसऱ्यांदा मातृत्वाचा अनुभव घेत असून तिने एका मुलाखतीमध्ये तिचा अनुभव शेअर केला आहे.
शाहिद-मीराच्या आयुष्यात आलेल्या या नव्या पाहुण्याचं नाव झैन असं ठेवण्यात आलं असून सध्या संपूर्ण कपूर कुटुंबीय या चिमुरड्याच्या दिमतीला हजर असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे शाहिददेखील पित्याचं कर्तव्य पूर्ण करत असून त्याने त्याच्या आगामी ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही हजेरी लावलेली नाही. तर मीरा तिच्या लाडक्या लेकाच्या संगोपनामध्ये व्यस्त आहे. विशेष म्हणजे झैनच्या जन्मापूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्ये मीराने तिचा आई होण्याचा अनुभव शेअर केला होता.
‘एक आई ज्यावेळी बाळाला स्तनपान करते त्यावेळी ती एका वेगळ्याच अनुभवातून जात असते. हा क्षण आई आणि बाळासाठी खास असतो. खरं पाहायला गेलं तर स्तनपान करणं हे एका आईने बाळाला दिलेली एक भेट असते’, असं मीरा म्हणाली.
पुढे ती असंही म्हणाली, ‘ज्यावेळी मिशा लहान होती तेव्हादेखील मी ब्रेस्टफिडींग करत होते.वेळोवेळी मी मिशाची काळजी घेत होते. त्यामुळे माझ्या येणाऱ्या दुसऱ्या बाळाची देखील मी अशीच काळजी घेईन यात शंका नाही. जेव्हा एखादी आई आनंदी असते. जेव्हा ती पोषक आहार घेते तेव्हा तिच्यातील हीच सकारात्मकता स्तनपानाद्वारे बाळाकडे जात असते. त्यामुळे आईने कायम आपल्या लहानग्यांसाठी आनंदी रहायला हवं’.