अॅमेझॉन प्राईमवरील गाजलेल्या मिर्झापूर वेबसीरिजचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिर्झापूर-२ चे चित्रीकरण पूर्ण झाले असून सध्या एडिटिंगचे काम सुरु आहे असे अली फजलने सांगितले. पहिल्या भागात अली फजलने गँगस्टर गुड्डू पंडितची भूमिका साकारली होती. उत्तरेत बाहुबलीभोवती फिरणार राजकारण, त्यातून येणारी गुंडगिरी याचे उत्तम चित्रीकरण मिर्झापूरमध्ये करण्यात आले होते.

सर्वसामान्य कुटुंबातील दोन मुले गुंडगिरीकडे कशी वळतात. कशा पद्धतीने गुन्हे जगतात एकएक पायरी चढून ते स्वत:चे स्थान निर्माण करतात. याचे उत्तम चित्रीकरण मिर्झापूरमध्ये करण्यात आले होते. नव्या सीझनमध्ये भरपूर काही आहे. माझी भूमिका पहिल्या भागाच्या तुलनेत पूर्णपणे वेगळी आहे असे अली फजलने सांगितले.

१६ नोव्हेंबर २०१८ रोजी पहिला भाग प्रदर्शित झाला होता. पुढच्यावर्षी एप्रिलमध्ये मिर्झापूर-२ रिलीज होण्याची शक्यता आहे.