भारताच्या मानुषी छिल्लरने नुकताच ‘मिस वर्ल्ड’चा किताब पटकावला. १७ वर्षांनतर भारताच्या सौंदर्यवतीने मिस वर्ल्ड स्पर्धेत बाजी मारली. एकीकडे हरयाणाच्या मानुषीचा गौरव देशभरात करण्यात येत आहे तर दुसरीकडे त्याच राज्यातून अभिनेत्री दीपिका पदुकोणला उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत. ‘पद्मावती’ चित्रपटाच्या वादावर आता मानुषीनेही प्रतिक्रिया दिली आहे.

मायदेशी परतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तिला ‘पद्मावती’संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. एकीकडे मानुषीने आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले यश साजरा केला जात आहे तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केलेल्या दीपिकाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, यावर तुझे काय मत आहे असे तिला पत्रकारांनी विचारले. भारतात महिलांवर काही मर्यादा लादल्या गेल्या असून त्या मैत्रीपूर्ण समाजाचा भागच नाहीत, असे अनेकदा वाटत असल्याची भावना तिने यावेळी व्यक्त केली.

वाचा : ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार ‘पद्मावती’?

‘महिलांनी आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना करावा. त्यांनी स्वत:वर आणि स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला हवा. अनेकदा आपल्याला मर्यादांना सामोरे जावे लागेल आणि महिलांसाठी आपले समाज मैत्रीपूर्ण नसल्याचे अनेकदा वाटते. पण वैयक्तिकदृष्ट्या प्रत्येक महिलेने आत्मविश्वासाने या गोष्टींचा सामना करत इतरांसमोर उदाहरण निर्माण केले पाहिजे,’ असं मानुषी म्हणाली.

वाचा : शिल्पा शिंदेनंतर दुसरी अंगुरी भाभीसुद्धा शो सोडणार?

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती या चित्रपटाला अजूनही राजपूत संघटनांचा तीव्र विरोध होत आहे. करणी सेनेमागोमाग बऱ्याच नेतेमंडळींनीही ‘पद्मावती’ला विरोध केला. हरयाणातील भाजप नेते सुरज पाल अमू यांनी तर राणी पद्मावतीची भूमिका साकारणाऱ्या दीपिका आणि दिग्दर्शक भन्साळी यांचा शिरच्छेद करणाऱ्याला दहा कोटींचे बक्षीस जाहीर केले होते.