‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या दुसऱ्या भागात भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर हे दोन स्टार खेळाडू सहभागी झाले होते. कॉमेडी किंग कपिल शर्माचा हा नवीन शो नुकताच नेटफ्लिक्सवर सुरू करण्यात आला आहे. यावेळी रोहितची पत्नी रितिका सजदेह सुद्धा उपस्थित होती.

रोहित आणि रितिकाची जोडी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. अनेक महत्त्वाच्या मॅचदरम्यान हिटमॅनची पत्नी त्याच्या व टीमच्या यशासाठी प्रार्थना करत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं. वैयक्तिक संसाराशिवाय रितिका रोहितची मॅनेजर म्हणून देखील जबाबदारी सांभाळते. तो फलंदाजीला आल्यावर रितिका नेहमी ‘फिंगर्स क्रॉस’ करून बसलेली असते. यासंदर्भात कपिल शर्माने रोहितला एक प्रश्न विचारला.

हेही वाचा : Video : समुद्र, सूर्यास्त अन्…; शशांक केतकरने दाखवली सेटवरची निसर्गरम्य जागा, चाहते म्हणाले, “मालवणला गेल्यासारखं…”

कपिल भारतीय कर्णधाराला विचारतो, “तुम्हा सगळ्या खेळाडूंमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण असतं. जेव्हा तू एखाद्या बॉलरला अगदी सहजपणे सिक्स मारतोस तेव्हा कधी कोणत्या बॉलरने तुला सांगितलंय का सिक्स नको मारूस आज माझी गर्लफ्रेंड आलीये वगैरे…?” यावर रोहित म्हणाला, “हो नक्कीच…आमच्यात असं संभाषण होतं. पण, मी त्यांना सांगतो. तुमची गर्लफ्रेंड आहे पण, माझी तर बायको येऊन बसते. एवढंच नाहीतर संपूर्ण सामन्यादरम्यान ती ‘फिंगर्स क्रॉस’ करून बसते. तर, ती माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहे.”

पुढे कपिल शर्माने रितिकाला विचारलं, “रोहितला पती म्हणून सांभाळणं कठीण की क्रिकेटर म्हणून कारण, तू त्याची मॅनेजर पण आहेस” यावर रितिका म्हणाली, “पती म्हणून कारण, कर्णधार म्हणून सांभाळून घेण्यासाठी त्याच्याकडे टीम आहे. मला काही करण्याची गरज नाही.” दोघांचं संभाषण सुरू असताना रोहित मध्येच म्हणतो, “तिला मैदानात किंवा ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश करता येत नाही पण, मला घरात जावं लागतं आणि ती तिथे एकमेव कर्णधार आहे.”

हेही वाचा : ‘जर तर ची गोष्ट’ नाटकाची शंभरी, प्रिया बापटच्या आवाजातील खास गाणं प्रदर्शित

दरम्यान, या सगळ्यात वर्ल्डकप पराभवाचा विषय काढल्यावर रोहित काहीसा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. हा संपूर्ण एपिसोड नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून सध्या हिटमॅनच्या चाहत्यांकडून या कार्यक्रमातील महत्त्वाच्या क्लिप्स व्हायरल करण्यात येत आहेत.