‘अवं मास्तर काही कळतं का नाही? रांगोळी काढलेली दिसत नाही व्हय? इथं चंद्रकला आणि सरकार बसणार आहेत, जरा मान-पान बघत चला, की दिसला पाट अनं टेकलं बूड, तुमची पानं बाहेर मांडली आहेत, तिकडं जाऊन बसा..

 

Krishna Janmabhoomi case mathura
‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
solapur lok sabha marathi news, ram satpute latest news in marathi
सोलापूरमध्ये धर्मगुरू, मठाधीशांच्या आशीर्वादासाठी उमेदवारांचा आटापिटा

‘काय म्हणावं या मास्तरला, डोस्कं बिस्कं फिरलया का अक्कल गहाण ठिवून आलायसा, काय म्हणते मी, नीट गुमान राव्हायचं असलं तर राव्हा,  नाहीतर चालू पडा. तुम्ही गेल्यावर कोणाला सुतक येणार नाही..

 

हे संवाद आहेत मराठीतील अजरामर ठरलेल्या ‘पिंजरा’या चित्रपटातील आणि ते आहेत ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे. खरे तर वत्सला देशमुख यांनी त्यांच्या प्रदीर्घ नाटय़-चित्रपट प्रवासात ‘िपजरा’मधील थोडय़ाफार प्रमाणात खलनायिकेकडे झुकणारी ‘आक्का’ची भूमिका वगळली तर खलनायिका किंवा खाष्ट भूमिका केलेल्या नाहीत. आजवर नेहमीच चरित्र अभिनेत्री किंवा सहाय्यक अभिनेत्री म्हणून त्यांनी काम केले. आई, काकू, मावशी, आत्या, आजी अशा ‘वत्सल’भूमिकेतूनच त्या प्रेक्षकांसमोर आल्या. प्रेक्षकांच्या मनावरही त्यांच्या या भूमिकांचाच ठसा राहिलेला आहे.

‘पुर्नभेट’च्या निमित्ताने त्यांच्याशी गप्पांच्या सुरुवातीलाच ‘पिंजरा’चा विषय निघाला. नव्या स्वरुपात ‘पिंजरा’ नुकताच आला. तेव्हा तो पाहायचा ठरवले होते. पण नाही जमू शकले. मी आणि संध्या दोघी वास्तवातही सख्ख्या बहिणी. मी मोठी व ती धाकटी. ‘िपजरा’मध्येही आम्ही बहिणीच होतो. या चित्रपटातील माझ्या भूमिकेला नकारात्मक छटा होती. चित्रपटाचे सर्व चित्रीकरण कोल्हापूरला ‘शांताकिरण’स्टुडिओत तसेच पन्हाळा परिसरात झाले. ही भूमिका सोडली तर आजवरच्या अभिनय प्रवासात माझ्या वाटय़ाला नकारात्मक भूमिका आल्याच नाहीत. मला करायची खूप इच्छा होती, पण मिळाल्या नाहीत आणि आता माझ्या वयाच्या ८७ व्या वर्षांत कोणी देणार ही नाही. पण करायची मात्र आजही उमेद असल्याचे वत्सलाताई हसत हसत सांगतात.

लहानपणाच्या आठवणी सांगताना त्या नकळत भूतकाळात गेल्या आणि आठवणींच्या लडी त्यांनी अलगद उलगडल्या. माझे वडील श्रीधरपंत देशमुख हे बापुराव पेंढारकर यांच्या ‘ललितकलादर्श’कंपनीत होते. कंपनीच्या नाटकातून लहान-मोठय़ा भूमिका ते करत असत. नाटक कंपनी फिरती असल्याने आई-वडिलांबरोबर आमचीही फिरती असायची. हळूहळू नाटके चालेनाशी झाली. कंपनीकडून नवी नाटकेही येत नव्हती. तेव्हा घर-खर्च चालविण्यासाठी वडिलांनी मुंबईत ‘श्रीराम मिल’मध्ये काही काळ नोकरी केली. सुरुवातीला ते मुंबईत आणि आई, मी, भाऊ व संध्या नाशिकला राहात होतो. वडील स्थिरस्थावर झाल्यानंतर आम्ही सगळेच मुंबईला आलो. मुंबईत होणाऱ्या मेळ्यांमधून मी व संध्या काम करायचो. काम म्हणजे काय गाणी म्हणणे असायचे. गायिका सुलोचना चव्हाण यांचाही मेळा होता. त्यातून काम केल्याचे आठवते. मुंबईत तेव्हा भुलेश्वरला राहात होतो. काही काळ बडोद्याला असताना तेथील लक्ष्मीकांत नाटक समाजातर्फे सादर झालेल्या ‘वीरपत्नी’ या नाटकाचेही मी काही प्रयोग केले होते. मुंबईत सुरुवातीच्या काळात बरीचशी गुजराथी नाटकेच मी केली. पण मी मराठी रंगभूमीवर काम करावे अशी वडिलांची इच्छा होती. सुदैवाने ‘राक्षसी महत्वाकांक्षा’ या नाटकात मला ‘मदालसा’ची भूमिका मिळाली. नानासाहेब फाटक यांच्या बरोबर मला काम करायला मिळाले हे मी माझे भाग्य समजते. माझ्या वडिलांनीच या भूमिकेची तालीम माझ्याकडून कसून करुन घेतली. ‘दामोदर’ला नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

मराठी रंगभूमीवर केलेल्या अन्य भूमिकांविषयी त्यांना बोलते केले तेव्हा किती सांगू व किती नको अशा आठवणी त्यांच्याकडे निघाल्या. वत्सलाताई म्हणाल्या, ‘राक्षसी महत्वाकांक्षा’ नंतर पुढे ‘रणदुदुंभी’मधील ‘सौदामिनी’, ‘त्राटिका’ नाटकात त्राटिकेचीच भूमिका, ‘संगीत संशयकल्लोळ’मध्ये ‘कृत्तिका’, ‘खडाष्टक’मध्ये ‘ताराऊ’, ‘बेबंदशाही’त ‘येसुबाई’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ मधील ‘सोयराबाई’ अशा अनेक  नाटकातून कामे केली. माझ्या नशिबाने मला  नानासाहेब फाटक, मा. अनंत दामले अर्थात नूतन पेंढारकर, मा. कृष्णराव, मा. नरेश, दिनकर कामण्णा, छोटा गंधर्व, हिराबाई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे अशा सगळ्या मोठय़ा मंडळींबरोबर काम करण्याची संधी मिळाली. चित्रपट प्रवासाबद्दल त्यांनी सांगितले, ‘शिर्डीचे साईबाबा’हा मराठी आणि ‘शिर्डी के साईबाबा’ हिंदी हे सुरुवातीचे चित्रपट. पुढे हिंदीत ‘तुफान और दिया’, ‘नवरंग’, ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’, ‘लडकी सह्य़ाद्री की’, ‘हिरा और पथ्थर’ तर मराठीत ‘वारणेचा वाघ’, ‘पिंजरा’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘ज्योतिबाचा नवस’, ‘झुंज’हे चित्रपट केले.

निर्माते-दिग्दर्शक ईश्वरलाल यांचा ‘जय शंकर’हा माझा पहिला हिंदी चित्रपट. त्या वेळची एक आठवण सांगताना वत्सलाताई म्हणाल्या, या चित्रपटात मी रावणाच्या आईची भूमिका करत होते. चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी रंजना लहान असल्याने (अवघी तीन/चार महिन्यांची होती ती) तिला मी बरोबर घेऊन जात असे. एकदा चित्रीकरणाच्या वेळेस वरून लहान मुलाची आवश्यकता होती. लहान मूल माझ्या हातात आहे असे काहीसे दृश्य होते. मी नको नको म्हणत असतानाही सेटवर लोकांनी आग्रह केला म्हणून रंजनाला चित्रीकरणासाठी मी हातात घेतले. तेव्हा ती झोपलेली होती. पण लाईट, साऊंड, अ‍ॅक्शन असे म्हटले गेले आणि ती चक्क डोळे उघडून आजूबाजूला टकामका पाहायला लागली. तिच्या अभिनयाचे बाळकडू तिला तिथेच मिळाले. त्या दिवशी सेटवर चित्रीकरणासाठी उभारण्यात आलेला एक खांब पडला, आग लागली पण त्यातून आम्ही दोघीही वाचलो. माझे शिक्षण फारसे झाले नाही त्यामुळे रंजनाने खूप शिकावे, मोठे व्हावे व अन्य क्षेत्रात नाव मिळवावे अशी माझी इच्छा होती. पण विधिलिखीत वेगळेच होते.  पुढे ती याच क्षेत्रात आली.

रंजनाचा विषय निघाला आणि त्या भावूक झाल्या. एका अपघातानंतर रंजनाला अपंगत्व आले. तशा अवस्थेतही तिने अनेक वर्षे काढली. मृत्यू समोर दिसत असतानाही ती मृत्यूला घाबरली नाही. शेवटपर्यंत आनंदी होती. मृत्यूलाही हसतमुखाने ती सामोरी गेली. रंजना हा त्यांच्या मनाचा एक हळूवार कोपरा आहे. त्या कोपऱ्यात वत्सलाताईंनी आपल्या मुलीच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत. रंजनाच्या जाण्याच्या धक्क्य़ाबरोबरच त्यांनी आणखी दोन मोठे धक्के पचविले. त्यांची दोन मुले हृदयविकाराच्या झटक्याने अचानक गेली. मोठा मुलगा नरेंद्र वयाच्या पन्नासाव्या वर्षी तर धाकटा मुलगा श्रीकांत याचे अवघ्या तिसाव्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले.  वैऱ्यावरही येऊ नये ते वत्सलाताईंच्या वाटय़ाला आले. या धक्क्य़ाने सुरुवातीला त्या खचून गेल्या. या काळात त्यांना उभारी देण्याचे आणि त्यांना सावरण्याचे काम त्यांची मैत्रीण गीता सोमण यांनी केले. वत्सलाताई यांच्या सांगण्यावरुन त्यांना नाटकात भूमिका मिळाली होती. त्याची जाण त्यांनी ठेवली आणि वत्सलाताई यांच्या त्या जवळच्या झाल्या. रंजना व दोन मुलांच्या निधनाने खचून गेल्यानंतर गीता सोमण या दररोज वत्सलाताई यांच्या घरी यायच्या. त्यांच्याशी गप्पा मारायच्या, काही वेगळ्या विषयात त्यांना गुंतवायच्या, बाहेर घेऊन जायच्या. यातून वत्सलाताई सावरल्या. दु:ख गिळून आयुष्याला पुन्हा एकदा नव्याने सामोऱ्या गेल्या. याचे श्रेय त्या आवर्जून गीता सोमण यांना देतात. कलाकारासाठी रसिकांकडून जी  प्रतिक्रिया मिळते, ती त्याच्या अभिनयाला दिलेली पावती असते. याबाबत एक आठवण त्यांनी सांगितली. सोलापूरला आमच्या ‘राक्षसी महत्वाकांक्षा’नाटकाचा प्रयोग होता. माझा ‘मदालसा’चा प्रवेश झाला आणि प्रेक्षकातून एकाने चप्पल माझ्या अंगावर भिरकावली.

नाटक संपल्यानंतर आतमध्ये विमलाबाई कर्नाटकी यांनी त्या प्रकाराबाबत विचारले. तेव्हा वत्सलाताईंनी त्यांना सांगितले, तुम्हाला तुमच्या गाण्याच्या तानेवर किंवा समेवर जेव्हा टाळी मिळते ती जशी तुमच्या गाण्याला मिळालेली दाद असते तशी प्रेक्षकांमधून आज भिरकविण्यात आलेली ही चप्पल म्हणजे माझ्या अभिनयाला मिळालेली पावती आहे, असे मी मानते.

राजकारण हा वत्सलाताईंच्या आवडीचा विषय आहे. सध्या राजकारणात आणि समाजात जे काही चालले आहे, ते त्यांना अस्वस्थ करते. पण आपण यात काहीच करु शकत नाही, अशी हतबलताही त्या व्यक्त करतात. वयोपरत्वे आता फारसे बाहेर पडणे होत नाही. ‘चला हवा येऊ द्या’च्या निमित्ताने जवळपास सोळा वर्षांनी त्या पुन्हा कॅमेऱ्यासमोर व प्रेक्षकांसमोर आल्या. वृत्तपत्र वाचन आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका पाहणे हा त्यांचा सध्याचा विरंगुळा आहे. नातू चेतन आणि नातसून शालिनी यांच्याबरोबर त्या आनंदात राहात आहेत. दोघेही आपली खूप खूप काळजी घेतात, असेही त्या आवर्जून सांगतात आणि नातसूनेचे कौतूकही करतात.

‘जय मल्हार’ही त्यांची आवडती मालिका आहे. नाटक, चित्रपटातून वत्सलाताई यांनी चरित्रात्मकच भूमिका आजवर साकारल्या. त्यामुळे साहजिकच दूरचित्रवाहिन्यांवरील विविध मालिकांधील चरित्र भूमिका त्यांच्या विशेष आवडीच्या. त्या त्या कलाकारांच्या भूमिकेचे त्या बारकाईने निरिक्षण करतात. अमूक प्रसंगात त्या कलाकाराने असे करायला हवे होते, तसे केले असते तर जास्त छान झाले असते अशी टिप्पणी त्या नातसूनेकडे व्यक्त करतात. पण हे त्या दोघींपुरतेच असते. या नव्या कलाकारांकडून शिकायलाही मिळते, असेही त्या सहजपणे सांगतात. तेव्हा आपण कोणीतरी मोठी अभिनेत्री आहोत असा अभिनिवेश अजिबात नसतो. तर एका सच्च्या कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला दिलेली ती मनमोकळी दाद असते.