‘पग वाला मुंडा’, ‘पटियाला पेग’, ‘इक कुडी’ या गाण्यांमुळे चर्चेत आलेला गायक- अभिनेता दिलजित दोसांज सध्या त्याच्या कारकिर्दीत बराच पुढे गेला आहे. गायक म्हणून सुरु झालेला त्याचा प्रवास आज एका अशा वळणावर आला आहे ज्या ठिकाणी प्रसिद्धी आणि यश त्याच्या अवतीभोवतीच पाहायला मिळत आहे. पण, बऱ्याच कलाकरांप्रमाणे दिलजितनेही सुरुवातीच्या काळात बऱ्याच अडचणींना तोंड दिलं आहे.
एका सर्वसामान्य कुटुंबातील दिलजितचे वडील पंजाब रोडवेजचे निवृत्त कर्मचारी होते. तर, त्याची आई गृहिणी. त्याचं खरं नाव दलजीत असं आहे. पण, २००४ मध्ये एका म्युझिक अल्बमच्या निमित्ताने त्याने नाव बदलून दिलजित असं ठेवलं. बालपणी गुरुद्वाऱ्यामध्ये प्रार्थनेसाठी जाणारा दिलजित गुरु नानक देवजींची किर्तनंही म्हणायचा. तेव्हापासूनच त्याचा आवाज अनेकांच्या कानी पडत होता. पण, बालपणीच्या दिवसांमध्ये दिलजितने हालाखीच्या परिस्थितीचा सामनाही केला आहे. आयुष्यात समोर आलेल्या प्रत्येक अडचणीवर मात करत त्याने चित्रपटसृष्टीत स्वत:चं स्थान मिळवलं आहे.

पंजाबी असण्याचा आणि डोक्यावर असलेल्या पगडीचा दिलजितला प्रचंड अभिमान आहे. मुख्य म्हणजे प्रेक्षकांमध्ये या अभिनेत्याविषयी अनेकांना बरीच माहिती आहे असं जर का वाटत असेल तर तसं नाहीये. कारण दिलजितचं खासगी आयुष्य तसं गुलदस्त्यातच आहे. अनेक तरुणींच्या मनात घर करणारा हा अभिनेता विवाहित असल्याचं म्हटलं जात. पण, त्याने कधीच याचा खुलासा केला नाहीये. दिलजित आणि त्याच्या पत्नीमध्ये काही वाद असल्यामुळे सध्या त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्याही चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. पण, त्याने या सर्व अफवा असल्याचं सांगत विषय टाळला.

diljit

पाहा : प्रशांत दामलेंच्या गोंडस नातीचे फोटो

‘द लायन ऑफ पंजाब’, ‘जट अॅण्ड ‘ज्युलियट’, ‘साड्डी लव स्टोरी’, ‘डिस्को सिंग’, ‘पंजाब १९८४’, ‘सरदार जी’, ‘अंबरसरिया’ आणि काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला ‘सुपर सिंग’ या चित्रपटांतून दिलजितच्या अफलातून अभिनयाची झलक पाहायाला मिळाली. फक्त पंजाबी चित्रपटांतच नव्हे तर, हिंदी चित्रपट विश्वातूनही ‘उडता पंजाब’, ‘फिल्लौरी’तून त्याने प्रेक्षकांना भुरळ पाडली असून, त्याच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

वाचा : ‘कोणत्याही मुलीला किस केल्यास मी तुझे ओठ चिरेन’