किशोर कुमारवर चरित्रपट करणार असून रणबीर कपूरची त्यात मुख्य भूमिका असेल, अशी घोषणा दिग्दर्शक अनुराग बसूने करून कित्येक महिने उलटले आहेत. मात्र, अद्याप या चित्रपटाची सुरुवात होऊ शकलेली नाही. या चित्रपटाचे काम पुढे न जाण्यामागे रणबीरच्या तारखा मिळत नसल्याचे कारण पुढे केले जात असले तरी प्रत्यक्षात मधुबालाच्या कुटुंबियांनी चित्रपटावर आक्षेप घेतला असल्याने हा चित्रपट रखडल्याचे बोलले जात आहे.
मधुबाला ही किशोरकुमार यांच्या चार पत्नींपैकी एक. अनुरागच्या चित्रपटात रणबीर हा किशोर कुमारची भूमिका साकारणार आहे. मधुबालाच्या कुटुंबियांबरोबर काही गोष्टींवर निश्चित निर्णय घ्यायचे बाकी आहे. त्यानंतरच कामाला सुरूवात होईल, अशी माहिती रणबीरनेही दिली आहे. मधुबालाची बहीण मधुर भूषण यांनी या चित्रपटाबाबत आक्षेप घेतला आहे. मधुबालाचे दिलीपकुमार यांच्याबरोबर असलेले प्रेमप्रकरण, त्यानंतर किशोरकुमारशी झालेली ओळख, प्रेम, लग्न हा सारा प्रवास, तिचा आजार या सगळ्या गोष्टी चित्रपटात असतील तर माझी हरकत नाही. पण, मधुबाला आणि किशोरकुमार यांच्यात झालेले वाद-भानगडी त्यांनी उकरून काढू नयेत, असे मधुर भूषण यांनी स्पष्ट केले आहे.
‘कोणत्या पती-पत्नीमध्ये भांडणे होत नाहीत. किशोरकुमार आणि मधुबाला यांच्यातही गैरसमज, वादविवाद होते. पण, या घटनांमागचे सत्य फक्त किशोरकुमार, मधुबाला आणि मलाच माहिती आहे. त्यामुळे अशा गोष्टी या चित्रपटात असू नयेत यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत’, असेही मधुर भूषण यांनी म्हटले आहे.
चित्रपटाची घोषणा करण्यापूर्वी एकदा तरी अनुराग आणि रणबीरने आम्हा कुटुंबियांना विश्वासात घ्यायला हवे होते. पण, अजूनही त्यांनी आमच्याशी संपर्क केलेला नाही. आमच्याशी चर्चा झाल्याशिवाय त्यांना चित्रपट सुरू करू देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. यामागचे कारण स्पष्ट करताना, किशोरकुमारच्या अन्य दोन पत्नी रूमा आणि लीना जिवंत आहेत. त्यांच्याविषयी काही वाईटसाईट दाखवले गेले तर त्या स्वत: किंवा त्यांची मुले सत्य काय हे समाजापुढे आणू शकतात. माझी बहीण आणि वडील दोघेही जिवंत नाहीत. त्यामुळे त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जाऊ नयेत, ही आपली जबाबदारी आहे म्हणूनच चित्रपटाला आक्षेप घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.