रणबीर कपूर आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी ही अभिनेता-दिग्दर्शक जोडगोळी संजय दत्तवरच्या चरित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येणार आहे. हे दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करतायेत. रणबीरसाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा ठरणार आहे. याची कल्पना जेवढी रणबीरला आहे तेवढीच ती हिरानींनाही आहे. त्यांच्या दृष्टीने हा चित्रपट वेगवेगळ्या अर्थानी महत्त्वाचा आहे. त्यातलं महत्त्वाचं कारण हे अर्थातच संजय दत्त आणि त्यांच्यातील मैत्रीचं नातं आहे. शिवाय, संजय दत्तचं एकूणच आयुष्य हे वादात अडकलेलं, गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेलं असल्याने हा चित्रपट हिरानी कोणत्या उद्देशाने करतायेत, याबद्दलही लोकांमध्ये उत्सुकता आहे. मात्र या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवत सध्या हिरानींनी आपल्या चित्रपटातील हिरोच्या रणबीर कपूरच्या मागे ठाम उभं राहायचं ठरवलं आहे. ते रणबीरच्या कामाने एवढे प्रभावित झाले आहेत की, ही जोडी पुन्हा चित्रपटातून दिसली तर नवल वाटणार नाही.

हिरानींच्या मते रणबीरची चित्रपटसृष्टीतील सुरुवातही वेगळी होती. त्याने भन्साळींच्या ‘सावरिया’तून पदार्पण केलं खरं.. पण त्यानंतर त्याने ‘वेक अप सिद’, ‘रॉकेट सिंग : सेल्समन ऑफ द इअर’ मग ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘राजनीती’, ‘रॉकस्टार’, ‘बर्फी’ हे सगळे वेगवेगळ्या धाटणींचे चित्रपट केले आणि तो यशस्वी अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरला. त्यानंतर भलेही त्याचे ‘रॉय’, ‘बॉम्बे वेल्वेट’ ते आत्ताचा ‘जग्गा जासूस’ हे चित्रपट चालले नसले तरी त्याची कारणं वेगळी आहेत, असं हिरानींचं म्हणणं आहे. रणबीर क धी दूर गेलाच नव्हता. तो एक सुंदर अभिनेता आहे. तो सातत्याने चित्रपटांमधून काम करतो आहे. फ्लॉप किंवा हिटमुळे तो प्रेक्षकांपासून दूर गेला आहे, असं म्हणणं चुकीचं ठरेल. मला त्याच्याबरोबरचं काम खूप आवडलं आहे आणि यापुढेही मी त्याच्याबरोबर काम करणार, असं सांगत हिरानी यांनी आपल्या हिरोची पाठ थोपटली आहे.

‘पीके’च्या यशानंतर खुद्द हिरानी आपला यशस्वी ‘मुन्नाभाई’ ब्रँड घेऊन परतण्याच्या तयारीत होते, मात्र संजय दत्तला झालेल्या शिक्षेमुळे त्या गोष्टी अर्धवट राहिल्या होत्या. त्यानंतर दिग्दर्शक म्हणून ते स्वत: याच चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. इतर चित्रपटांपेक्षा या चित्रपटाचं दडपण अधिक आहे हे ते कबूल करतात. या चित्रपटाबद्दल लोकांच्याही खूप वेगळ्या अपेक्षा आहेत, असं ते स्पष्ट करतात. चित्रपटाचं शीर्षक अजूनही निश्चित झालेलं नसलं तरी या आठवडय़ात आयपीएलच्या निमित्ताने चित्रपटाचा टीझर लाँच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. २४ एप्रिलला चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार असून त्यानंतर आयपीएलदरम्यान तो सातत्याने दाखवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या चित्रपटाबद्दल अभिनेता संजय दत्तची प्रतिक्रिया काय, याबद्दल विचारले असता त्याने अजून पूर्ण चित्रपट पाहिलेला नसल्याचे हिरानी यांनी स्पष्ट केले. या चित्रपटातील काही दृश्ये, टीझर संजयने पाहिले आहेत, मात्र पूर्ण चित्रपट पाहिलेला नाही. अर्थात, त्याला जे दाखवण्यात आलं त्या दृश्यांची संख्याही जास्तच असल्याने त्याला चित्रपटाबद्दल कल्पना आली आहे, असेही ते म्हणाले.

चित्रपट पूर्ण झाल्यावर तो पहिल्यांदा पाहणारी व्यक्ती संजय दत्तच असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. मुळात आपल्यावर एक चित्रपट तयार झाला आहे ही कल्पनाच त्याला अजून पचत नाही आहे; पण त्याला हा चित्रपट पाहायचा आहे, त्याला हे सत्य हळूहळू का होईना स्वीकारणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याची प्रतिक्रिया आपोआपच सगळ्यांना कळेल, असंही त्यांनी सांगितलं. सध्या मात्र ते या चित्रपटासाठी रणबीरची झालेली निवड आणि त्याने केलेलं काम यावर बेहद्द खूश आहेत. चित्रपट योग्य पद्धतीने पूर्ण झाल्याचं समाधानही असल्याचं त्यांनी सांगितलं.