सोशल नेटवर्किंगवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रातोरात एखादी व्यक्ती सेलिब्रिटी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. याच व्यक्तींच्या यादीमध्ये आता रेल्वे स्टेशनवर गाणं गाणाऱ्या रानू मंडल यांच्या नावाचा समावेश झाला आहे. रेल्वे स्थानकावर गाणं गाणाऱ्या रानू यांच्या मधूर आवाजातील गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर  बॉलिवूड अभिनेता आणि गायक हिमेश रेशमियाने त्याच्या आगमी चित्रपटात त्यांना गाण्याची संधी दिली आहे. या रेकॉर्डींगच्या व्हिडिओही व्हायरल झाला आहे. मात्र आता या एका गाण्यासाठी मंडल यांना हिमेश दिलेल्या मानधनाचा आकडाही समोर आला आहे. तो आकडा वाचूनही तुम्हाला धक्का बसेल.

हिमेश रेशमियाचा ‘हॅप्पी हार्डी अॅन्ड हीर’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी रानू मंडल यांनी ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे गायले आहे. हे गाणे रेकॉर्ड करताचा रानूचा व्हिडीओ हिमेशनेच इन्स्टाग्रामवर शेअर केला आला आहे. या व्हिडीओमध्ये रानू हिमेशसह उभी राहून गाणे गात असल्याचे दिसत आहे. रानू गाणे गात असताना हिमेश बाजूला उभा राहून रानू यांना प्रोत्साहन देताना दिसून आला.

एका वृत्तानुसार रानू यांनी रेकॉर्डींग स्टुडिओमध्ये गायलेल्या त्यांच्या पहिल्यावहिल्या गाण्यासाठी हिमेशने त्यांना जवळपास सहा ते सात लाख रुपये मानधन दिले आहे. मात्र हिमेशने देऊ केलेले हे रानू स्वीकार करत नव्हत्या. मात्र हिमेशने त्यांना अगदी आग्रहाने हे पैसे दिले. इतकचं नाही तर हिमेशने त्यांना तुम्ही बॉलिवूडमध्ये नक्की यशस्वी होणार असंही सांगितलं. ‘तुम्हाला बॉलिवूडमध्ये स्टार होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही,’ अशा शब्दांमध्ये हिमेशने त्यांना प्रोत्साहन दिले आहे.

रानू ही मुंबईमध्ये राहणारी आहे. पतीच्या मृत्यूनंतर उदर्निवाह करण्यासाठी रानू वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर गाणे गात असे. गाणे गाऊन मिळणाऱ्या पैशातून ती तिचे पोट भरत असे. काही दिवसांपूर्वी रानूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रानू रेल्वे स्टेशनवर भारतातील दिग्गज गायिका लता मंगेशकर यांचे गाणे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि रानू रातोरात स्टार झाली. तिचा सुरेल आवाज ऐकून अनेक गाण्याच्या ऑफर तिला येऊ लागल्या. दरम्यान तिला गाणे गाण्यासाठी कोलकत्ता, केरळ आणि बांगलादेशमध्ये बोलवण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.