भन्साळींच्या ‘पद्मावती’चा मुहूर्तच बहुधा चुकला असावा. चित्रपटातील मुख्य जोडी ठरली तरी नायिकेला नवरा ‘प्रतिष्ठित’ अभिनेता हवा म्हणून चित्रिकरणाचा शुभारंभ होत नव्हता. एकेक करत शाहीद कपूरची नावनिश्चिती झाल्यानंतर चित्रपट पुढे सरकेल म्हणायचा तर.. शाहीदला पाहूणा म्हणा, असा नवा हट्ट चित्रपटाचा दुसरा नायक रणवीर सिंग याने सुरू केला आहे. रणवीरच्या या हट्टाने भन्साळींची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे. ‘पद्मावती’च्या कथेत महाराणी पद्मावती आणि तिच्याबद्दल अल्लाउद्दीन खिलजीला असणारे आकर्षण हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे या दोन्ही भूमिका दीपिका-रणवीर जोडीने कराव्या, अशी भन्साळींची इच्छा होती आणि त्या दोघांनी होकारही दिला. या भूमिकेमुळे रणवीर पहिल्यांदाच चित्रपटात खलनायकी भूमिका साकारणार आहे. मात्र या दोन व्यक्तिरेखांबरोबरच पद्मावतीचा पती रावल रतन सिंग याचीही तितकीच महत्त्वाची भूमिका आहे. महत्प्रयासानंतर भन्साळींनी या भूमिकेसाठी शाहीदला राजी केले. रावल रतन सिंगचे पत्नी पद्मावतीवर खूप प्रेम होते. त्यामुळे या चित्रपटात शाहीदलाही रणवीर इतकीच मोठी समांतर भूमिका आहे आणि नेमकी हीच गोष्ट रणवीरला मान्य नाही आहे.

शाहीदची चित्रपटातील भूमिकेची लांबी कमी करून त्याला केवळ पाहुणा कलाकार म्हणून चित्रपटात ठेवावे, असा तगादा रणवीरने सुरू केला आहे. खरेतर, या चित्रपटाच्या सुरुवातीलाच रणवीरने भन्साळींकडे चित्रपटाची पटकथा मागितली होती. त्यावरून या दोघांचे संबंध आधीच ताणलेले होते. आता त्यात रणवीरच्या या आग्रहाची भर पडली आहे. मात्र शाहीदला इतक्या प्रयत्नानंतर राजी केल्याने आता त्याला पाहुणा कलाकोर म्हणून स्थान देणे शक्य नाही हे भन्साळींनाही ठाऊक आहे. शाहीद सध्या कारकिर्दीच्या उच्च स्तरावर आहे. त्यामुळे त्याने कुठल्याही चित्रपटात दुय्यम भूमिका घेण्याचा प्रश्नच येत नाही. रणवीरची मागणी मान्य केली तर शाहीद चित्रपट सोडणार आणि रणवीरने भूमिका सोडली तर खिलजीची खलनायची भूमिका करणारा चेहरा शोधणे जड जाणार, अशा दुहेरी पेचात सापडलेल्या भन्साळींनी अखेर आता दीपिकाची मदत घेतली आहे. दीपिकाने रणवीरशी बोलून हा प्रश्न सोडवावा, अशी गळ तूर्तास भन्साळींनी घातली आहे. मात्र हे प्रकरण धसास लागले नाही तर काय? ही चिंता भन्साळींना सतावते आहे.