बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता रणवीर कपूर महिलांच्या भावना दुखावणाऱ्या जाहिरातीमुळे अडचणीत सापडला होता. दिल्लीतील एका महिला वकिलाने राष्ट्रीय महिला आयोगाकडे रणवीर विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे रणवीरच्या अडचणी वाढल्या आहेत. ‘जॅक अॅण्ड जोन्स’ या कपड्याच्या ब्रॅण्डच्या जाहिरातीमध्ये अभिनेता रणवीर सिंग झळकला होता. या जाहिरातीमध्ये रणवीरने महिलांना दुखावले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिला आयोगाने रणवीरसह जाहिरातदार कंपनीला नोटीस पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे. रणवीरची ही जाहिरात स्री-पुरुष समानतेला सुरुंग लावणारी असून महिलांना अपमानित करणारी असल्याचे मत संबंधित वकिलांनी महिला आयोगाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

जॅक अॅण्ड जोन्स’ या कपड्याच्या ब्रॅण्डच्या जाहिरातीमध्ये अभिनेता रणवीर सिंगच्या सहभागामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली होती. ट्विटरवरुन या बहुचर्चित जाहिरातीमध्ये रणवीरने केलेल्या कामामुळे त्याला चांगलेच धारेवर धरण्यात आले होते. पण सदरप्रकरणी शेवटी रणवीरने आपली बाजू मांडत महिलांच्या भावना दुखावल्याप्रकरणी माफी मागितली होती. ‘मी झाल्या प्रकाराबद्दल माफी मागतो. जाहिरातीच्या बिलबोर्डद्वारे आम्हाला काही दुसरेच सांगण्यात आले होते. त्या जाहिरातीमध्ये असलेली चूक आमच्याही निदर्शनास आली आणि ती जाहिरात त्यानंतर लगेचच काढून टाकण्यात आली’, असे स्पष्टीकरण रणवीरने दिले होते.

ट्विटरवर या जाहिरातीवर बरीच टीका करण्यात आली. ज्यामध्ये असेही म्हटले गेले आहे की, या जाहिरातीमध्ये महिलांना एक संभोगाची गोष्ट म्हणून दाखविण्यात आले आहे. कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे शोषण या मुख्य मुद्द्यालाही असंवेदनशीलपणे हाताळण्यात आले आहे. त्यामुळे ‘अॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डर्ड्स काऊन्सिल ऑफ इंडिया’ कडे ही जाहिरात काढून टाकण्याविषयीची तक्रार करण्यात आली होती. याच मुद्द्यावरुन होणाऱ्या चर्चा आणि विरोध लक्षात घेत रणवीरनेही त्याची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे रणवीरच्या या भूमिकेवरुन चाहते आणि ट्विटरकरांचा राग काहीसा मावळला होता. मात्र या तक्रारीमुळे रणवीरला पुन्हा अडचण निर्माण होऊ शकते, असे दिसते.
रणवीर सिंगच्या अभिनयाने साकार झालेला ‘बेफिक्रे’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासूनच ते प्रदर्शनापर्यंत चर्चेत असणाऱ्या चित्रपटाला रणवीरवरील आरोपाचा परिणाम होतो का? हे येणारा काळाच ठरवेल.