गुरुवारी वरळी पोलीस स्थानकात बॉलिवूड अभिनेत्री रति अग्नीहोत्री आणि त्यांचे व्यावसायिक पती अनिल वीरवानी यांच्यावर वीज चोरीचा आरोप करण्यात आला आहे. वीज चोरी केल्याच्या आरोपावर त्यांच्यावर ४७ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गुरुवारी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहनच्या (बेस्ट) अधिकाऱ्यांनी त्यांच्या इमारतीवर छापा टाकला होता. तेव्हा त्यांना कळले की रति यांच्या पतीने वीजेच्या मीटरसोबत छेडछाड केली आहे.

सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपार्टमेन्टमध्ये छापा टाकल्यानंतर त्यांनच्यावर कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, रति आणि त्यांच्या पतीने गेल्या तीन वर्षांत ४७ लाख रुपयांच्या वीजेची चोरी केली आहे. बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, साडेतीन वर्षांपूर्वी रती आणि त्यांच्या पतीने त्यांच्या इमारतीशी जोडलेल्या इलेक्ट्रॉनिक मीटरसोबत छेडछाड केली आहे.

बेस्टच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कोर्टाच्या परवानगीने आम्ही संशयावरुन कोणत्याही इमारतीवर छापा टाकू शकतो. आमच्या टीमला वाटले की त्या इमारतीच्या मीटरमध्ये काही तरी गडबड आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही अपार्टमेन्ट गुरुवारी सकाळी १०.३० वाजता छापा टाकला आणि या संदर्भात पोलीस स्थानकातही सुचना देऊन ठेवल्या. आम्हाला तेव्हा कळले की गेल्या तीन वर्षांपासून ते असे करत आहेत आणि या तीन वर्षांचे बील सुमारे ४७ लाखांपर्यंत आहे.

पोलीस उपायुक्त प्रवीण पडवळ यांनी ही अधिकृत घटना आहे असेही सांगितले. ते म्हणाले की, ‘आम्ही रती आणि त्यांचे पती अनिल यांच्या विरोधात बेस्टच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’

याबाबतीत रती आणि त्यांचे पती अनिल यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, ‘मी, रती आणि माझा मुलगा तनुज आम्ही कोणीच यावेळी मुंबईमध्ये नाही आहोत. मलाही या घटनेबाबत सकाळी कळले आणि मला फारच आश्चर्य वाटले. मला वाटते या प्रकरणात काही गैरसमज झाले आहेत. मी शहरात आल्यानंतर यावर बोलणार आहे. आम्ही या अपार्टमेन्टमध्ये गेले ९- १० वर्ष राहत आहोत. याआधी असे काही झाले नव्हते. मला माझी बाजू मांडण्याची संधीही नाही मिळाली याचे मला दुःख वाटते. अधिकाऱ्यांनी मला फोन करुन सांगितले की त्यांना माझे घर बघायचे आहे. म्हणून मी माझ्या दोन नोकरांना त्यांना घरी घेण्यास सांगितले. मला या सगळ्या प्रकरणाचे आश्चर्य वाटत आहे.’