काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘रॉक ऑन’ या चित्रपटाने तरुणाईला वेगळेच वेड लावले होते. एका वेगळ्याच कथानकावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाच्या गाण्यांनाही अनेकांची पसंती मिळाली होती. आता ‘रॉक ऑन’ या चित्रपटाची पुन्हा चर्चा आहे ती म्हणजे त्याच्या पुढील भागामुळे. याबाबतच बोलताना अभिनेता पुरब कोहलीने ‘रॉक ऑन २’ या चित्रपटाच्या माध्यमातून एक परिपक्व कथानक रसिकांच्या भेटीला येणार आहे असे मत मांडले आहे.
या चित्रपटाचा पहिला भाग आणि आता नव्याने येऊ घातलेला दुसरा भाग या दोहोंमध्येही आठ वर्षांचा काळ लोटल्यामुळे कथानकामध्ये एक मोठा बदल पाहण्याची संधी मिळणार आहे. या चित्रपटातील भूमिकेबद्दल सांगताना ‘चित्रपटातील अनुभव फारच छान होता. या अठ वर्षांमध्ये आमच्या व्यक्तिगत जीवनातही काही महत्त्वाचे आणि सकारात्मक बदल झाले आहेत’, असे म्हणत ‘आमच्या आभिनयात झालेला बदल या चित्रपटाच्या माध्यमातून पाहण्याची संधी सिनेरसिकांना मिळणार आहे’ असेही पुरबने सांगितले. ‘रॉक ऑन २’ या चित्रपटाबाबत रसिकांधमध्येही कमालीची उत्सुकता लागून राहीली असून ११ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘रॉक ऑन’ च्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन अभिषेक कपूरने केले होते. तर, ‘रॉक ऑन २’ च्या दिग्दर्शनाची जबाबदारी शुजात सौदागर यांनी घेतली आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर या चित्रपटामध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाबदादल सर्वांनाच उत्सुकता लागून राहीली असली तरीही ‘रॉक ऑन २’ च्या ट्रेलरसाठी मात्र रसिकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे रसिकांसह ‘रॉक ऑन २’ ची संपूर्ण टीमसुद्धा या चित्रपटासाठी उत्सुक आहे.
या चित्रपटाच्या पहिल्या भागात म्हणजेच ‘रॉक ऑन’मध्ये एका बॅन्डमधील चार सदस्यांभोवती फिरणारे कथानक साकारण्यात आले होते. अभिनेता फरहान अख्तर, अर्जुन रामपाल, पुरब कोहली आणि ल्यून केनी या कलाकारंनी ‘रॉक ऑन’मध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.