बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता- दिग्दर्शक आणि अभिनेत्री आलिया भट्टचे वडील महेश भट्ट यांनी गुरुवारी (२० सप्टेंबर) आपला वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यातच त्यांच्या आगामी ‘जलेबी’ या चित्रपटातील अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिनेसुद्धा सोशल मीडियावर महेश भट्ट यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला. महेश भट्ट यांना शुभेच्छा देण्यासाठी शेअर केलेला हा फोटो तिला चांगलाच महागात पडला. कारण फोटो शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.

महेश भट्ट यांच्या आगामी ‘जलेबी’ या चित्रपटात रिया मुख्य भूमिका साकारत आहे. आपल्याला करिअरमध्ये त्यांनी योग्य दिशा दाखवल्याने, मार्गदर्शन केल्याने रियाने त्यांचे पोस्टद्वारे आभार मानले. त्यांच्या फोटोसोबतच तिने भावूक संदेशसुद्धा लिहिला. ‘तुम्ही प्रत्येक वेळी मला प्रेमाने साथ दिली. मला स्वतंत्रपणे, मुक्तपणे वावरायला शिकवलं. तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रकाशाने सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रकाशित करता,’ असं तिने लिहिलं. पण नेटीझन्सनी रिया आणि महेश भट्ट यांच्या फोटोची खिल्ली उडवली.

https://www.instagram.com/p/Bn8DsVSHVUA/

काही युजर्सनी तर रिया आणि महेश भट्टची तुलना अनुप जलोटा आणि त्यांची गर्लफ्रेंड जसलीनशी केली. सध्या अनुप- जसलीन ही जोडी खूप चर्चेत आहे. ‘बिग बॉस १२’मधली ही जोडी त्यांच्या रिलेशनशिपमध्ये चर्चेत आहे. यामागचं कारण म्हणजे दोघांच्या वयातील ३७ वर्षांचं अंतर.
‘बिग बॉसचा परिणाम संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे,’ अशी कमेंट एकाने लिहिली. तर काहींनी तुम्ही एकमेकांना डेट करत आहात का असा प्रश्न केला. आता यावर रिया आणि महेश भट्ट ट्रोलर्सना काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.