बॉलिवूड अभिनेते संजीव कुमार त्यांच्या जमान्यातील सुपरस्टार होते.एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात जी काही स्वप्न पाहते ती सर्व स्वप्न संजीव यांनीही पाहिली होती. त्यांनी स्वतःच्या स्वप्नांचा पाठलागही केला. त्यांचे सिनेमे हिट होत गेले आणि त्यांची प्रत्येक स्वप्न ही हसत- हसत पूर्ण झाली. बॉलिवूडने घराचं सोडून त्यांची न पाहिलेलीही शेकडो स्वप्न पूर्ण केली. संजीव आयुष्यभर भाड्याच्या घरात राहिले. ते भाड्याच्या घरात का राहत होते? एवढी मिळकत असूनसुद्धा त्यांनी स्वतःचे घर का विकत घेतले नाही? या तुमच्या प्रश्नाची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

संजीव यांना भाड्याच्या घरात राहून बराच काळ झाल्यानंतर त्यांनी स्वतःचं घर विकत घेण्याचा विचार केला होता. घराच्या शोधात असताना त्यांना एक घर फार आवडले. घरमालकाला त्यांनी घराची किंमतही विचारली. तेव्हा त्या घराची किंमत ५० हजार रुपये होती. संजीव यांनी पैशांची सोय केली आणि घर विकत घेण्यासाठी ते घरमालकाकडे गेले. पण तेव्हा घरमालकाने घराची किंमत वाढवली आणि ७० हजार रुपये केली. संजीव यांना ते घर फारच आवडले असल्यामुळे त्यांनी उरलेल्या २० हजार रुपयांचीही सोय केली.

जस जसे संजीव कपूर पैशांची तरतूद करत होते तसतसा घरमालक घराची किंमत वाढवत होता. ७० हजारानंतर त्यांनी घराची किंमत वाढवून १ लाख रुपये केली. पण घरमालकाचा हेतूच चांगला नाही, त्याचे घरही मला घ्यायचे नाही असा निर्णय संजीव यांनी घेतला. काही काळानंतर त्यांनी दुसरे घर विकत घेतले. तिथे ते राहायला ही गेले. पण घर खरेदीच्या काही महिन्यातच ते घर कायद्याच्या कचाट्यात अडकल्याचे त्यांना कळले. त्यामुळे संजीव यांना ते घरही सोडावे लागले. पुन्हा एकदा ते भाड्याच्या घरात राहू लागले. या दोन घरांनंतर त्यांनी नंतर कधीही स्वतःचे घर घेतले नाही.