बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान सध्या तिच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चर्चांमुळे प्रसिद्धीस येत आहे. पण ती नक्की कोणत्या सिनेमातून आणि कोणत्या अभिनेत्यासोबत पदार्पण करणार याबद्दल अधिकृत माहिती मिळत नव्हती. पण आता सारा तिचा पहिला सिनेमा सुशांत सिंग राजपूतसोबत करणार आहे हे जवळपास निश्चित झाले आहे. ही एक प्रेम कहाणी असणार आहे.

सुशांत पुन्हा एकदा ‘काय पो छे’ सिनेमाचा दिग्दर्शक अभिषेक कपूरसोबत काम करणार आहे. गेल्या काही वर्षांपासून तारखा जुळून येत नसल्यामुळे सुशांत आणि अभिषेक एकत्र काम करू शकत नव्हते. आता या दोघांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला असून या सिनेमात साराही काम करणार आहे.

या सिनेमाचे चित्रीकरण पुढच्या वर्षी सुरू होणार आहे. बालाजी मोशन पिक्चर्समधील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक आपल्या या सिनेमासाठी नवीन जोडीच्या शोधात होता. त्यामुळेच त्याने सैफच्या मुलीची म्हणजे साराची मुख्य अभिनेत्री म्हणून निवड केली. सिनेमाच्या टीमने यासंदर्भात साराशी संपर्क केला. सारालाही सिनेमाची कथा आवडली आहे. ती येत्या दोन आठवड्यांत या सिनेमाच्या करारावर स्वाक्षरी करणार आहे.

एकता कपूर ही साराची आई अमृता सिंगच्या फार जवळची व्यक्ती आहे. त्यामुळे जेव्हाही अमृताला छोट्या पडद्यावर आगमन करायचे असेल तेव्हा एकता तिच्या मदतीला असेलच. स्वतः एकताला अमृताला छोट्या पडद्यावर आणण्याची इच्छा आहे. अमृताने एकताची निर्मिती असलेल्या ‘फ्लाइंग जट्ट’ या सिनेमात टायगर श्रॉफच्या आईची भूमिका साकारली होती. त्यामुळे अमृताला आपल्या मुलीच्या पदार्पणासाठी एकतावर पूर्ण विश्वास आहे. अमृताने या प्रोजेक्टसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

सध्या सारा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. ती अनेकदा इन्स्टाग्रामवर आपले फोटो शेअर करत असते. तर सुशांत सध्या ‘राबता’ या त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सिनेमात त्याच्यासोबत क्रिती सनॉन आहे. याशिवाय सुशांतच्या ‘ड्राइव्ह’ या आगामी सिनेमात तो जॅकलीन फर्नांडिससोबत दिसणार आहे तर ‘रॉ’ सिनेमात तो पुन्हा एकदा दिशा पटानीसोबत काम करणार आहे.