सत्यरंजन चंद्रशेखर धर्माधिकारी

१ एप्रिल २०२४ रोजी ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये (आमच्यासाठी मुळ्येकाका) यांचा ‘माझा पुरस्कार’ सोहळा संपन्न झाला. गेली अनेक वर्षे अनौपचारिक स्वरूपाच्या ‘माझा पुरस्कार’ सोहळ्याला मी प्रमुख पाहुणा असतो. त्यापूर्वी माझे वडील जात असत. मुळ्येकाका आमंत्रणापेक्षा तंबी देतात. उपस्थित न राहण्याचे परिणाम काय होतील अशी धाकधुक असते. तारीख निश्चित झाल्या झाल्या त्यांचा भ्रमणध्वनी म्हणजे न्यायालयाच्या समन्सपेक्षा अधिक धडकी भरवणारी गोष्ट असते. अनेक आमंत्रित म्हणतात की न येण्याचे परिणाम आणि प्रत्यक्ष उपस्थित राहिल्यावर जे काही नशिबी येते त्यात फारसा फरक नसतो. त्यांच्यापैकी काहींना सतत होणारा अपमानदेखील सुखावणारा वाटतो. म्हणून मुळ्येकाकांच्या उपक्रमात आणि ‘उचापतीत’ नाट्यसृष्टीतील व इतर आवर्जून सामील होतात. त्यांना पुरस्कार अर्पण करायला हात लागतात म्हणून माझा नंबर लागतो. मंचावर नसलेल्या व निमंत्रणाला ‘मान’ देऊन आलेल्या कलाकारांना मुळ्येकाका वेगळाच प्रसाद वाटतात. ते उभे राहिल्यानंतर न्यायालयातील प्रथेप्रमाणे पुकारा होतो व त्या व्यक्तीकडून काही आगळीक झाली असेल तर उद्धार ठरलेला. त्या व्यक्तीला त्याचा गुन्हा आणि त्याबद्दल शिक्षाही एकाच सुनावणीत ठोठावली जाते. प्रशंसेची तऱ्हासुद्धा निराळी आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. ‘तुम्ही चांगले, नावाजलेले कलाकार आहात, पण आजवर येणे शक्य झाले नाही आज आयते जाळ्यात अडकलात’ असे म्हणत मुळ्येकाका सत्कारमूर्तीला आडवे करतात. तुमचे काम फार छान झाले आणि तुम्ही सुंदर अभिनय केलात म्हणून मागचे सगळे विसरून पुरस्कारासाठी तुमची निवड केली असे म्हणत काका कौतुकाचा वर्षावदेखील करतात. तद्नंतर मी मंचावर येऊन त्यांना पुरस्कार द्यावा असा हुकूम सुटतो. आदेशानुसार कार्यवाही होते. पुरस्कारप्राप्त कलाकारांना पाठीवर थाप आणि शाबासकी व सोबत संपूर्ण पांढरे शुभ्र असे स्मृतिचिन्ह. तरुणांना यशाने हुरळून न जाता पाय जमिनीवर ठेवून पुढील वाटचाल करा, असा वडिलकीचा सल्ला मिळतो.

हे वर्षानुवर्षे चालले आहे. आता मुळ्येकाका ऐंशीच्या घरात आहेत. शारीरिक थकवा दिसतो. मात्र उत्साह मुला-मुलींना लाजवेल असा असतो. सबकुछ मुळ्ये असे उपक्रमाचे स्वरूप असते. मी ज्या क्षेत्रात आहे त्याचे उदाहरण द्यायचे तर फौजदारी खटल्यात फिर्यादी व बचाव पक्ष आणि न्यायाधीश अशा सगळ्या भूमिका एकाच व्यक्तीने वठवायच्या नसतात. ते कायद्याला मंजूर नसते. मुळ्येकाकांचा कायदाच वेगळा. त्यांनीच बनविलेला आणि त्याची अंमलबजावणीही त्यांचीच. त्यांच्या निकाल निवाड्याला आव्हान देण्याची मुभा नाहीच, कारण तेच न्यायालय. माझ्या हातून पुरस्कार देऊन ते माझा सन्मान करतात की त्यांच्या कारवाईला मंजुरी मिळवितात हेच समजत नाही. काही वेळेला मौन म्हणजे संमती असाही अर्थ घेतला जातो. म्हणून मी एकदा माझ्या वडिलांना विचारले की मुळ्येकाकांच्या एकपात्री प्रयोगात आपण कुठली भूमिका करतो? आपले प्रयोजन ते काय? आपण का जायचे? त्यांचे उत्तर ऐकल्यानंतर मी प्रश्न विचारणे बंद केले. ते बंधनकारक व पटण्यासारखे होते. माझे वडील म्हणाले की, अशोक मुळ्ये हे एक अद्भुत रसायन आहे. रंगकर्मी म्हणून ते रंगभूमीसाठी सतत खटपट करतात.

हेही वाचा >>>Video: स्वतःच्या मुलाला कोर्टात खेचणाऱ्या बाबाची गोष्ट, ‘जुनं फर्निचर’चा विचार करायला भाग पाडणारा ट्रेलर प्रदर्शित

माझे वडील म्हणाले, मुळ्येकाका केवळ रंगभूमी आणि नाट्यव्यवसायाचे हित पाहात नाहीत तर त्या व्यवसायातील लोकांना प्रेक्षकांचे महत्त्व पटवितात. प्रेक्षकांना व्यासपीठ नसते हे ज्ञात असल्यामुळे काका त्यांचा आवाज बनतात. रंगकर्मी आणि प्रेक्षक हे एकत्र आल्याशिवाय हा व्यवसाय टिकणार नाही. तसेच दर्जा आणि गुणवत्ता नसेल तर हा व्यवसाय धंदा होईल. पर्यायाने प्रेक्षकांचे मनोरंजन व संजीवन होणार नाही. नावीन्य, सर्जनशीलता आणि धडाडी असल्याशिवाय पठडीबाहेरील नाटक / चित्रपट व प्रेक्षक दोन्ही दिसणार नाहीत. म्हणूनच प्रेक्षक आणि रंगकर्मी यांच्यातला मुळ्येकाका एक महत्त्वाचा दुवा आहेत. तसेच विचार आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याची जेव्हा गळचेपी झाली त्या वेळेस मुळ्येकाका नाटक व कलाकार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले याचीही प्रचीती येते. (उदा. गोलपीठा हे नाटक).

केवळ रंगकर्मी अशी मुळ्येकाकांची ओळख नाही. त्यांचे व्यक्तिमत्त्व संवेदनशील आहे. अभिनेते, लेखक-दिग्दर्शक, निर्माते आणि नाट्य व्यवसायाशी जोडलेले सगळे आणि माझ्यासारखे त्यांचे चाहते यांना काकांमुळे परिघाबाहेरील जग कळते. काकांनी आम्हा सगळ्यांना प्रेक्षकांची वेगळी ओळख करून दिली. ते म्हणतात की, केवळ दोन घटका करमणूक म्हणून तिकिटाचे पैसे खर्च करून हे नाटक / चित्रपट पाहतात असे समजू नका तर अनेकांना त्यांचे दु:ख, वेदना, व्यथा, दैना विसरायच्या असतात. असे लोक ओळखायला आणि त्यांच्यापर्यंत पोहोचायला, त्यांना समजून घ्यायला एक माध्यम ही मुळ्येकाकांची भूमिका असते. समाजातल्या अनेक घटकांना काका कलाकारांच्या निकट आणण्याचे काम करतात. मतिमंद मुला-मुलींची आई, अंध आणि शारीरिक व्यंगाने पिडलेले (दिव्यांग), परिचारिका व पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या जीवनात आनंदाचे, विश्रांतीचे, निवांतपणाचे काही क्षण असा कार्यक्रम स्वखर्चाने ते करतात. जुन्या रंगकर्मींना विरंगुळ्यासोबतच आपली आठवण कोणाला तरी येते हे समाधान काकांमुळे लाभते. मोनिका मोरेंसारख्या अपघातात हात गमावलेल्यांना काका उपचार, औषधपाणी यासाठी आर्थिक मदतीसोबत जगण्याची उमेद देतात. त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी काका कलाकारांशी त्यांच्या भेटी घडवितात. जगावेसे वाटते असे वातावरण काकांमुळे निर्माण होते असे कित्येकजण मला सांगतात. रंगकर्मीची समाजाप्रती असलेली बांधिलकी काकांच्या विविध उपक्रमांमुळे दृढ होते. रंगकर्मीच्या संवेदना आणि जाणिवा समृद्ध आणि बळकट होतात, कारण काका त्यांना समाजातील वास्तवाचे दर्शन घडवितात. म्हणूनच त्यांच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहतो. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. स्वत:विषयी ते फारसे बोलत वा सांगत नाहीत; मात्र त्यांच्या विविध योजना आणि उपक्रमांना प्रसिद्धी मिळावी असे त्यांना वाटते. माणुसकीचा प्रसार आणि प्रचार व्हावा ही त्यांची सदिच्छा. ‘माझा पुरस्कार’ सोहळ्यामागची त्यांची भूमिका या वेळेस अभिनेता वैभव मांगले आणि संकर्षण कऱ्हाडे या कलाकारांना नेमकी कळली. त्यांनी मुळ्येकाकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली तेव्हा मला त्यांचा अभिमान वाटला.

पद, पैसा नसतानाही मुळ्येकाका भरपूर कामं करतात, कारण त्यांना सहकार्य करणारे अनेक हात आहेत. या मंडळींना प्रसिद्धी आवडत नाही. मात्र काका त्यांचा ऋणनिर्देश करायला विसरत नाहीत. ते म्हणतात की माझे उपद्व्याप दुसऱ्याच्या बळावर आणि पैशावर चालतात. या वर्षीच्या सोहळ्याला त्यांचे मित्र व हितचिंतक नरेंद्र हेटे, श्री. व श्रीमती मुद्दा, श्रीमती व श्री. विनायक गवांदे, अॅड. संजीव सावंत दाम्पत्य आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे शिवाजी मंदिर दादरचे सारे विश्वस्त व कर्मचारी यांचा हातभार लागला. श्री. विजय सोनावणे यांनी विशिष्ट असे पांढऱ्या रंगाचे स्मृतिचिन्ह तयार केले म्हणून काका त्यांना व्यक्तिश: भेटून धन्यवाद देतात.

मुळ्येकाकांची आजवरची वाटचाल आपल्याला सामान्य माणसाचे असामान्यत्व म्हणजे काय हे सांगते. कार्ल सेंडबर्गचे एक वाक्य आठवते. तो म्हणतो, ‘ I am the People – the Mob – the Crowd – the Mass. Do you know that all the great work of the World is done through me.’ मुळ्येकाकांना माझा सलाम!

लेखक निवृत्त न्यायमूर्ती आहेत.