‘नेटफ्लिक्स’ या प्रसिद्ध ऑनलाइन व्यासपीठावर आता बॉलिवूडच्या किंग खानची म्हणजेच शाहरुखची वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या वेब सीरिजमधून अभिनेता इम्रान हाश्मी वेब विश्वात पदार्पण करत आहे. ‘बार्ड ऑफ ब्लड’ Bard of Blood असं या वेब सीरिजचं नाव असून त्याच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

नेटफ्लिक्सची भारतातील ही तिसरी मूळ वेब सीरिज आहे. इम्रानसोबतच यामध्ये किर्ती कुल्हारी, विनीत सिंग मुख्य भूमिकेत आहेत. लेहमध्ये या वेब सीरिजची शूटिंग सुरू आहे. रेड चिलीज इंटरटेन्मेंटचे गौरव वर्मा यांनी ट्विटरवर लिहिलं, ‘आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. १८ महिन्यांच्या मेहनतीनंतर आज शूटिंगला सुरुवात झाली आहे. माझ्या या प्रवासात इम्रान हाश्मी, रिभू दास गुप्ता आणि माझे सहकारी सोबत आहेत.’ शाहरुखने हे ट्विट रिट्विट केले आहे.

ही वेब सीरिज बिलाल सिद्दीकी यांच्या ‘द बार्ड ऑफ ब्लड’ या पुस्तकावर आधारित आहे. या बहुभाषिक सीरिजमध्ये कबीर आनंद या बहिष्कृत गुप्तचराची कथा साकारण्यात येणार आहे.

सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजने यशाचं शिखर गाठलं. या सीरिजच्या दुसऱ्या भागाची जोरदार चर्चा होती. पण #MeToo मोहिमेवर त्याच्या निर्मितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. तरीसुद्धा शाहरुखच्या या वेब सीरिजसमोर ‘सेक्रेड गेम्स’हून अधिक यश मिळवण्याचं आव्हान राहिल असं म्हणायला हरकत नाही.