इम्तियाज अली दिग्दर्शित ‘जब वी मेट’ हा चित्रपट आजही अनेकजण आवर्जून पाहतात. करिना कपूर, शाहिद कपूर या जोडीची धमाल केमिस्ट्री असलेल्या या चित्रपटाच्या कथानकापासून ते संगीतापर्यंत सर्वत गोष्टींनी प्रेक्षकांची पसंती मिळवली. या चित्रपटाला तब्बल दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करणाऱ्या या चित्रपटाने त्या वेळी काही विक्रमही प्रस्थापित केले होते. पण, प्रेक्षकांच्या प्रशंसेस पात्र ठरलेल्या या चित्रपटातील एका दृश्यात बदल करण्याची इच्छा खुद्द दिग्दर्शक इम्तियाज अलीनेच व्यक्त केली. त्या दृश्याने इम्तियाज आजही संतुष्ट नाही.

खुद्द इम्तियाजनेच याबद्दलचा खुलासा केला आहे. या चित्रपटातील एका दृश्यात करिना साकारत असलेल्या ‘गीत’ला ट्रेन पकडून देण्यासाठी शाहिद म्हणजेच ‘आदित्य’ अगदी वेगाने टॅक्सी चालवत तिला स्थानकावर वेळेत पोहोचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो. त्या दृश्यासाठी त्यावेळी इम्तियाजने ‘मिनीएचर’ दृश्याचा वापर केला होता. या दृश्यातील रेल्वे दाखवण्यासाठी मिनीएचर पद्धतीचा घाट घालण्यात आला होता. पण, आता मात्र ते दृश्य पाहताच त्यात काही महत्त्वाचे बदल करण्याची इच्छा असल्याचे इम्तियाजने स्पष्ट केले.

वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा

दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘जब वी मेट’ हा चित्रपट खऱ्या अर्थाने इम्तियाजच्या कारकिर्दीला कलाटणी देऊन गेला होता. दिग्दर्शक म्हणून हा त्याचा दुसरा चित्रपट होता. याआधी त्याने ‘सोचा न था’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. पण, त्या चित्रपटाला विशेष लोकप्रियता मिळाली नाही. पहिल्या चित्रपटाला मिळालेल्या अपयशानंतर मात्र इम्तियाज बराच सजग झाला आणि त्याने फॅमिली ड्रामा, भारतीय संस्कृती, प्रेम या सर्व गोष्टी एकवटत ‘जब वी मेट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.