क्या समाज को जगाना है कविता

या कुझ बताना, छुपाना

बिन कुछ कहे

सब कुछ कह जाना है कविता

या फिर संवेदना के दीप को

शब्दो के होर से तुफानो से बचाना है कविता

या इतिहास जिसे भुलो दे

राजनीती जिसे नजरअंदाज करे

उस मासूम से सत्य को जिवीत रखना है कविता

शायद और भी बहोत कुछ है कविता

पर अगर सरलता से सोचे तो शायद

दो घडी ठेहरकर जिंदगी की नदी को बहते हुए देखना है कविता..

गीतकार प्रसून जोशी यांनी लिहिलेल्या या ओळींमध्ये कवितेची वेगवेगळी रूपे आणि कविता स्फुरण्यामागची भावना दर्शविण्यात आली आहे. मोकळ्या आकाशात रात्रीचे चांदणे टिपावे त्याप्रमाणे कवितेत मुक्तपणे विचार आणि अनुभव मांडता येतात. मात्र हे स्वातंत्र्य गीत लेखन करताना मिळते का? याच विषयाचा ऊहापोह ‘टाटा लिटरेचर लाइव्ह’ या साहित्य महोत्सवात गीतकार प्रसून जोशी, ब्रिटिश कादंबरीकार मार्टनि एमिस, आंतरराष्ट्रीये ख्यातीचे कवी सिमोन आर्मिचेज यांनी ‘गीतकारांना कवी म्हणायचे का?’ या परिसंवादात केला.

[jwplayer zOGMZ9UX]

भारताच्या तुलनेत अमेरिका आणि इंग्लंडची परिस्थिती वेगळी आहे. भारतात गीतांचा आवाका मोठा आहे. त्यामुळे अनेक कवी आता गीतकार म्हणून नावारूपास येत आहेत. गीतकारांना कवी म्हणायचे का, याबाबत देशांच्या सांस्कृतिक बदलानुसार दुमत असले तरी कवी हे चांगले गीतकार असतात यावर मात्र सर्वाचे एकमत झाले.

भारतात संत परंपरेतून अनेक कविता गीतांमध्ये आल्या आहेत. यात दलित कवितांबरोबरच, ग्रामीण भागात जात्यावर दळताना स्त्रियांच्या अनुभवावर आधारित कविता, रानात मत्रिणींसोबत संसारातील समस्या मांडतानाच्या कविता, गीतांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या आहेत. कैफी आझमी, साहिर लुधीयान्वयी यांच्या कवितांना देशभरातील प्रेक्षक लाभला आहे. त्याबरोबरच गालिब, गुलजार यांनी लिहिलेल्या गझल संगीतबद्ध करण्यात आल्या आहेत. विविध कवीच्या कवितांचे गीतांमध्ये संक्रमण झाल्यामुळे पानावरील शब्दांनी आकाशात झेप घेतली आहे, असे सांगत प्रसून जोशी यांनी गीतांमागची पाश्र्वभूमी स्पष्ट केली.

कविता गीतात येताना त्याचा भावार्थ बदलणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे आग्रही मतही जोशी यांनी मांडले. त्यांनी लिहिलेल्या कविता ‘तारे जमिन पर’ या चित्रपटात गीतांच्या रूपात प्रेक्षकांसमोर आल्या. ‘दिल्ली ६’ या चित्रपटातील ‘रेहना तू है जैसे तू’ ही कविता त्यांनी एका व्यक्तीसाठी लिहिली होती, मात्र चित्रपटात दिल्ली शहराला उद्देशून या कवितेचा वापर करण्यात आला. असा एक वेगळा अनुभवही प्रसून जोशी यांनी सांगितला. ओजस्वी आणि मनाचा ठाव घेणारी रचना असेल, तर ती कवितेच्या रूपात असो वा गीतेच्या रूपात त्याचे तेज प्रेक्षकांना भूरळ घालतेच, असा ठाम विश्वासही जोशींनी मांडला.

इतर देशांची परिस्थिती वेगळी असून इंग्लंडमध्ये कविता आणि गीतांमध्ये खूप अंतर असल्याचे सिमोन आर्मिचेज यांनी सांगितले. इंग्लंडमध्ये गीतांत भावार्थापेक्षा शब्दार्थाला महत्त्व दिले जाते. इंग्रजीतील ‘शा ला ला ला ला इन द मॉìनग.’ अशा प्रकारचे गीत कवितेच्या रूपात येऊ शकत नाही. गीतांमध्ये साचेबद्धपणा असतो, संगीत आणि यमक जुळवणे गीतांमध्ये अनिवार्य असते. मात्र कविता या चौकटीच्या पलीकडील विचार व्यक्त करतात. त्यामुळे कविता आणि गीतांमध्ये खूप अंतर आहे. कवितेचे रूपांतर चांगल्या गीतात होऊ शकते मात्र गीत ही चांगली कविता असेल यात साशंकता आहे, असेही ते म्हणाले.

ब्रिटिश कादंबरीकार मार्टनि एमिस यांनी कविता या अधिक भावनाप्रधान असल्याचे सांगितले. गीतकारांच्या तुलनेत कवींना मिळणारे स्थान हे लाखमोलाचे असते. कवींची प्रतिभा गीतकारांच्या तुलनेत विश्वव्यापी असते अशी मांडणी त्यांनी केली.

एकंदर या चर्चासत्रात गीत आणि कवितांचा चहूअंगानी विचार करण्यात आला. कवी आणि गीतकार यांमध्ये पुसट सीमारेषा आहेत, मात्र बदलत्या काळात या रेषा हळूहळू कमी होत चालल्या आहेत, असा सूर व्यक्त झाला. कविता गीताच्या माध्यमातून सामोरे येत असताना, या संक्रमणामुळे कवितेचा मूळ विचार सर्वच स्तरावर पोहोचत असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

[jwplayer v3i8cWFS]