गायक अभिजीत भट्टाचार्यने Abhijeet Bhattacharya पुन्हा एकदा ट्विटरवर वापसी केली आहे. एक आठवड्यापूर्वीच ट्विटरने अभिजीतचे अकाऊंट सस्पेंड (बंद) केले होते. त्यानंतर या गायकाने नवीन अकाऊंट सुरु केले आहे. हे आपले अधिकृत अकाऊंट असून, बाकीचे सर्व ट्विटर अकाऊंट खोटे असल्याचे त्याने म्हटलेय.

अभिजीतने नवीन अकाऊंट सुरु केले असून, त्याने एक व्हडिओ शेअर केला आहे. यात त्याने भारत माता की जय असे म्हणत त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटलेय. तसेच, जोपर्यंत त्याचे अधिकृत ट्विटर अकाऊंट सुरु होत नाही तोपर्यंत या नव्या अकाऊंटवरून तुम्ही मला फॉलो करू शकता असेही त्याने सांगितले.

वाचा : ‘ट्विटर राष्ट्रविरोधी, हिंदूविरोधी आणि मोदीविरोधी’

जेएनयूतील विद्यार्थी संघटनेतील महिला पदाधिकारी शहला रशीद यांच्याविरोधात त्याने ट्विटरवर असभ्य भाषेचा वापर केला होता. त्यानंतर शहला यांनी अभिजीतचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यासाठी ट्विटरकडे तक्रार करण्याचे आवाहन केले होते. या आवाहानला सकारात्मक प्रतिसाद देत ट्विटरने अभिजीतचे अकाऊंट सस्पेंड करण्याचा निर्णय घेतला होता. अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर अभिजीत म्हणालेला की, ‘ट्विटर राष्ट्रविरोधी, हिंदूविरोधी, मोदीविरोधी, सैन्यविरोधी असूने ते दहशतवादाच्या समर्थकांचे व्यासपीठ आहे. सर्व दहशतवाद्यांना शिक्षा करायला हवी. हे जिहादींचे ट्विटर आहे. आम्ही केवळ गायक नसून, देशाचा आवाज आहोत. राष्ट्रविरोधी असणाऱ्यांना आम्ही खुलेपणाने विरोध करू. ट्विटर आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करतोय.