संपूर्ण देश सध्या करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे त्रस्त आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा कृष्ण जन्माष्टमी आणि दहिहंडीचा सण यावेळी अगदी साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. प्रत्येक जण घरी राहून आनंदात हा दिवस साजरा करत आहेत. दरम्यान अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या अनोख्या अंदाजात देशवासीयांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच जन्माष्टमीच्या निमित्ताने ऑनस्क्रीन कृष्णाने तिला दिलेली खास भेट तिने आपल्या चाहत्यांना दाखवली आहे.

अभिनेता स्वप्निल जोशीने तिला पाच वर्षांपूर्वी भगवद्गीता भेट म्हणून दिली होती. गेल्या अनेक वर्षांपासून तिला संपूर्ण गीता वाचायची होती परंतु पुरेसा वेळ मिळत नव्हता. अखेर लॉकडाउनच्या निमित्ताने तिला वेळ मिळाला आहे. जन्माष्टमीच्या निमित्ताने स्वप्निलने दिलेलं हे पुस्तक तिने आपल्या चाहत्यांना दाखवलं आहे.

श्रावण महिन्यात अनेक सण साजरे होतात, व्रत केली जातात. रिमझिम पावसाच्या धुंद मनमोहक वातावरणात आध्यात्मिक व धार्मिक परंपरांचा वारसा जोपासायचे काम श्रावण महिना करतो. श्रावणात येणाऱ्या अनेक सणांपकी सर्वाचा लाडका सण म्हणजे गोकुळाष्टमी, कृष्णजन्माचा दिवस. श्रावण महिन्याच्या वद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला. कंसाच्या कडेकोट बंदिवासात देवकीने आपल्या आठव्या पुत्राला जन्म दिला. विष्णूच्या या आठव्या अवताराचे या दिवशी पृथ्वीवर दुर्जनांच्या नाशासाठी झालेले हे आगमन, म्हणून हा दिवस मोठय़ा भक्तिभावाने व जल्लोषात साजरा केला जातो.