अभिनय क्षेत्रात बराच काळ सक्रीय राहिल्यानंतर अभिनेते रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी याविषयीची घोषणा केली. या सुपरस्टार अभिनेत्याने राजकीय कारकिर्दीस सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यामध्ये चाहत्यांसोबत कलाविश्वातील त्यांच्या काही मित्रमंडळींचाही समावेश होता. त्यातीलच एक नाव म्हणजे अभिनेता नाना पाटेकर यांचे. रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याचे कळताच नानांनी त्यांना या नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या. पण, त्यासोबत आपल्या निर्णयावर त्यांनी पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करावा असा सल्लाही नानांनी दिला.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये यशशिखरावर असणाऱ्या रजनीकांत यांच्या निर्णयामुळे आपल्याला आनंद झाला असला तरीही एका अर्थी त्यांनी आपल्या स्टारडमबद्दल धोका पत्करला असल्याचे मत नानांनी एका कार्यक्रमात मांडले. ‘आजच्या घडीला लोक तुमच्यावर प्रेमाचा, स्तुतीसुमनांचा वर्षाव करत आहेत. पण, राजकारणात सक्रीय झाल्यानंतर मात्र हेच लोक तुम्हाला प्रश्न विचारु शकतील. कारण, तुम्ही स्वत:च त्यांना हा अधिकार देत आहात’, असे आपण रजनीकांत यांना सांगितल्याचे नानांनी स्पष्ट केले.

वाचा : कर्ता, कर्म आणि ‘करनी’

राजकारणात प्रवेश केल्यानंतर ठरलेल्या गोष्टी, दिलेली वचनं पूर्ण केली नाहीत तर एखाद्या कलाकाराच्या कारकिर्दीवरही त्याचा परिणाम होतो. फक्त चांगलं आणि प्रामाणिक असणे पुरेसे नसते. त्यातही रजनीकांत हे अतिशय भोळ्या स्वभावाचे असल्यामुळेच आपल्याला ही चिंता भेडसावत असल्याचे मत त्यांनी मांडले. राजकारणात काही गोष्टींच्या बाबतीत तडजोड करायला जमलेच पाहिजे जी क्षमता आमच्यात नाही, असे म्हणत आपणही राजकारणापासून दूर असल्याचे नानांही सांगितले. जर अभिनय क्षेत्रात सक्रिय असणारी एखादी व्यक्ती राजकारणात प्रवेश करत असेल तर त्यांनी कलाविश्वातून काढता पाय घ्यावा. या दोन्ही क्षेत्रांना एकत्र घेऊन चालता येऊ शकत नसल्याचे म्हणत त्यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला.