‘बढो बहू’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या रिताशा राठोड या अभिनेत्रीचा टेलिव्हिजन इंडस्ट्रीत आता चांगलाच जम बसला आहे. रिताशाची मालिकेतील भूमिका आणि खऱ्या आयुष्यातील रिताशा यात बराच फरक आहे. ती पुढारलेल्या विचारांची असून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली मतं परखडपणे मांडते. नुकतेच ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या फेसबुक पेजवर रिताशाची एक मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली. या मुलाखतीदरम्यान तिने बऱ्याच गोष्टींवर आपली मतं मांडली. लैंगिक शोषण, ‘बॉडी शेमिंग’चे काही प्रसंगही तिने यावेळी सर्वांसमोर मांडले.

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतही लैंगिक शोषण, मानसिक छळ अशा गोष्टींचा सामना करावा लागत असल्याच्या खुलासा तिने केला. याविषयीचाच एक अनुभव सांगताना तिने आपल्या हेअर स्टायलिस्टचे उदाहरण दिले. तिच्याविषयी सांगताना रिताशा म्हणाली, “एक मुलगा तिच्यावर प्रेम करत होता. मात्र, तिने त्या मुलाला नकार दिला. पण, तिचा नकार तो पचवू शकला नाही. त्या परिस्थितीत हात जाळून घेणंही त्याला ‘रोमॅन्टिक’ वाटत होते. जितक्या वेळी तू मला नकार देशील तितक्या वेळी मी स्वत:ला इजा पोहोचवेन आणि त्याला तूच जबाबदार असशील, असेच ते तिला वारंवार सांगत होता. आम्ही याबद्दल काही व्यक्तींची मदत घेण्याचाही प्रयत्न केला होता. पण, त्याआधीच तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता.”

वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा

टेलिव्हिजन विश्वात अभिनेत्रींविषयी आजही जुनाट पद्धतीने विचार केला जातो. महिला म्हणजे त्यांना एक प्रकारचे खेळणेच वाटते, असेही ती म्हणाली. ‘एकदा आपण दिग्दर्शक आणि अभिनेत्यामधील संवाद ऐकला होता. ज्यामध्ये अभिनेता दिग्दर्काला सांगत होता की, मालिकेतील अमुक एक अभिनेत्री दिग्दर्शकाशी गरजेपेक्षा जास्त जवळीक करु पाहात आहे. त्यावर दिग्दर्शकानेही विनोदी अंदाजात ‘एक चमाट मार दे… चूप हो जायेगी’ असे म्हणत प्रतिक्रिया दिली’, असा अनुभव रिताशाने सांगितला. या प्रसंगाला अनुसरुन तिने एक महत्त्वाची गोष्टही मांडली. महिलांकडे आजही त्या सक्षम नाहीत याच दृष्टीने पाहिले जाते. पण, त्यांचा आजचा विनोद उद्याचे वास्तव व्हायला फारसा वेळ लागणार नाही हेसुद्धा तितकेच खरे. मी स्वत:सुद्धा या क्षेत्रात बॉडी शेमिंगचा शिकार झाले आहे. माध्यमांच्याच एका प्रतिनिधीने माझ्याविषी एका मुलाखतीत वक्तव्य केले होते की, फक्त स्थूल शरीरामुळेच मला ‘बढो बहू’ या मालिकेत बढोची भूमिका मिळाली. अभिनयाच्या प्रशिक्षणासाठी मी घेतलेली मेहनत, खर्ची घातलेली काही वर्षे या साऱ्याला काहीच किंमत नाही हे किती वाईट आहे…’