जवळपास १० वर्षे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करून ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत डॉ. निलेश साबळेंबरोबर कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे अशी तगडी स्टारकास्ट होती. या विनोदवीरांनी महाराष्ट्राला खळखळून हसवलं आणि आता काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

‘चला हवा येऊ द्या’ संपल्यावर डॉ. निलेश साबळे ‘कलर्स मराठी’वर एक नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. यामध्ये ओंकार भोजने आणि भाऊ कदम झळकणार आहेत. तर, अभिनेता कुशल बद्रिके सध्या हिंदी कॉमेडी शोमध्ये काम करत आहे. ‘चला हवा येऊ द्या’ मधील प्रत्येक विनोदवीराने आपली वेगळी वाट धरलेली असताना भारत गणेशपुरे यांची छोट्या पडद्यावरील मालिकेत एन्ट्री झाली आहे.

हेही वाचा : ठरलं तर मग : सुभेदारांच्या घरी आली साक्षी! चैतन्य अन् अर्जुनमध्ये होणार जोरदार भांडण, मालिकेत पुढे काय घडणार?

झी मराठी वाहिनीवर काही दिवसांपूर्वीच ‘शिवा’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामध्ये अभिनेत्री पूर्वा फडके आणि अभिनेता शाल्व किंजवडेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अशातच समोर आलेल्या नवीन प्रोमोमध्ये मालिकेत भारत गणेशपुरेंची एन्ट्री झाल्याचं समोर आलं आहे. शिवा राहत असलेल्या वस्तीचे नगरसेवक म्हणून भारत गणेशपुरे मालिकेत झळकणार आहेत.

हेही वाचा : “महाराष्ट्र सरकार आणि सायबर सेलकडे…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाची चिन्मय मांडलेकरसाठी पोस्ट, म्हणाले…

आता भारत गणेशपुरे साकारत असलेली भूमिका पाहुण्या कलाकाराची आहे की, कायमस्वरुपी ते मालिकेत झळकतील हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु, कथानक पाहता ही भूमिका पाहुण्या कलाकाराची असण्याची दाट शक्यता आहे. परंतु, आपल्या आवडत्या अभिनेत्याला मालिकेत पाहून सध्या प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.